

मुंबई: ‘ऑपरेशन टायगर ३’ला सुरुवात झाली आहे. थोडं थांबा, ठाकरेंचे १४ पेक्षा जास्त आमदार आमच्या सोबत येतील, असा दावा शिवसेना नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे. एकनाथ शिंदे बोलत नाहीत, फक्त दाढीवर हात फिरवतात. हे स्वतः उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांनी कबूल केलं आहे. एकनाथ शिंदे दाढीवर हात फिरवतात त्यावेळी ऑपरेशन टायगर यशस्वी होते, असेही गुलाबराव पाटील म्हणाले.
सहा फुटीर खासदारांविरोधात उद्धव ठाकरे यांनी रणशिंग फुंकले असून ते तीन दिवस संबंधित मतदारसंघात दौरे आणि मेळावे घेणार आहेत. याबाबत विचारले असता गुलाबराव पाटील यांनी खोचक टोला लगावला. उद्धव ठाकरे यांनी फिरलेच पाहिजे, मुलाने केले नाही तर बापाने ते केलेच पाहिजे, असे ते म्हणाले.
खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना अर्वाच्य भाषा वापरली. त्यावर गुलाबराव पाटील म्हणाले, पत्रकार हा देशाचा चौथा स्तंभ आहे. तो आपला आरसा आहे, आरशाला दगड मारू नये. वादविवाद होत असतात, आमचेही होतात. पण याचा अर्थ मारामारी करणे, शिवीगाळ करणे असा होत नाही.