

मुंबई: ज्या श्री राम जन्मभूमीचे भाजपने राजकारण केले त्याच भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांनी अयोध्येच्या श्री राम मंदिराची तिजोरी लुटली. अयोध्येच्या राम मंदिरातील भाविकांच्या देणग्यांवर पंतप्रधान मोदी व संघाच्या‘खास लोकांचा दरोडा पडला आहे.
या प्रकरणात कारवाईचे नाटक नको, तर निष्पक्ष चौकशी करा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शुक्रवारी केली.
भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एकही नेता या दरोड्यावर बोलत नाही. प्रभू रामाला भक्तीभावाने देणग्या देणाऱ्या भाविकांचा हा घोर अपमान आहे.हिंदूंचा हा अपमान कदापी सहन केला जाणार नाही. भाविकांच्या देणग्यांवर दरोडा टाकणाऱ्या बदमाशांना कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे, असे सपकाळ म्हणाले.
अयोध्येतील प्रभू श्री राम मंदिरात भाविकांनी दिलेल्या देणग्यांमध्ये झालेल्या चोरी व पैशाच्या अफरातफरी प्रकरणात चौकशीदरम्यान राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे प्रमुख चंपत राय आणि विश्वस्त अनिल मिश्रा यांनी राजीनामा दिला आहे.
पण त्यांच्यावर गुन्हा दाखल केला नाही. चंपत राय यांचे लागेबांधे थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी आहेत. त्यांना मोकळे सोडून अटक केलेल्यांमध्ये दान मोजणी करणारे कर्मचारी, मोजणी प्रक्रियेचे प्रमुख, प्रक्रियेवर देखरेख करणारे निवृत्त बँकर आणि राम मंदिर ट्रस्टचे मुख्य विश्वस्त चंपत राय यांचे चालक व विश्वासू रामाशंकर यादव यांचा समावेश आहे.
घोटाळा करणारे निकटवर्तीय मोकाट आणि कर्मचा-यांना अटक हे म्हणजे "मोदी है तो मुमकीन है!’’ असा प्रकार असल्याचे सपकाळ म्हणाले. सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली सदर प्रकरणाचा तटस्थ आणि निष्पक्ष तपास झाला पाहिजे.
मोदी सरकारमध्ये थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल तरी त्यांनी ताबडतोब ही चौकशी लावावी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ताबडतोब नोंदणी करून अहवाल उघड करावा, असेही सपकाळ म्हणाले.