

Offering garlands, coconuts banned in Siddhivinayak temple from today
मुंबई : पुढारी वृत्तसेवा
भारत-पाकिस्तानात सध्या सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर देशभरात सतर्कता बाळगली जात आहे. याचाच एक भाग म्हणून मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराने मोठा निर्णय घेतला आहे. मंदिर प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव आज (रविवार) पासून भाविकांना हार आणि नारळ अर्पण करण्यास मनाई केली आहे.
हा नियम आजपासून लागू होणार असल्याची माहिती न्यासाच्या वतीने देण्यात आला आहे. भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाला भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहन मंदिर प्रशासनाकडून करण्यात आले आहे. सध्याची परिस्थिती पाहता भाविकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे आवश्यक आहे, त्यामुळे हा बदल करण्यात आला आहे.
पहलगाम दहशतवाद्यांनी गोळीबार करून निष्पाप येथे भारतीयांचा बळी घेतला होता. यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानातील ९ दहशतवादी अड्डे उद्धवस्त केले होते. यानंतर पाकिस्ताने आगळीक करून भारतीय शहरांवर ड्रोन हल्ले केले. हे सर्व हल्ले भारतीय सैन्याने परतवून लावले. यावर भारतानेही पाकिस्तानला जशास तसे उत्तर देउन पाकिस्तानच्या इस्लामाबादपर्यंत आत शिरून हल्ले चढवले.
भारताच्या या कडक प्रतिहल्ल्यामुळे गांगरून गेलेल्या पाकिस्तानने सीमेवरील गावांना लक्ष्य केले आहे. यामध्ये अनेक भारतीय लोकांचे प्राण गेले आहेत. तसेच मालमत्तेचेही मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान भारताने पाकिस्तानच्या लॉन्चपॅडवर हल्ले करून ते उद्धवस्त केले आहेत. तसेच पाकिस्तानची मोठी हानी केली आहे. यानंतर पाकिस्तानने काल (शनिवार) नमते घेतले होते. त्यामुळे भारतानेही तात्काळ युद्धविराम जाहीर केला होता. मात्र रात्री पुन्हा पाकिस्तानने भारतावर ड्रोन अटॅक करून युद्धबंदीचे उल्लंघन केले आहे. हे सर्व हल्ले भारताने निष्प्रभ केले आहेत. मात्र आता भारत काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.
गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात पाकिस्तानने ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न केला होता. कच्छ सीमेवर ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न करताना तीन ड्रोन पाडले. गुजरातच्या सीमावर्ती भागात पाकिस्तानकडून हल्ला होण्याची भीती असल्याने राज्यातील 18 जिल्हे हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहेत. राज्यातील सोमनाथ आणि द्वारका मंदिरांची सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली असून भूज विमानतळाचा ताबा लष्कराने घेतला आहे आणि राज्याच्या सर्व बंदरांचीही सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.