

कोणत्याही देशाने पाकिस्तानला दोष दिलेला नाही किंवा त्यांच्यावर दबावही आणलेला नाही. अमेरिका जरी भारताचा चांगला मित्र असला, तरी त्यांच्याकडूनदेखील थेट समर्थनाचं कुठलंही विधान आलेले नाही. हे युद्ध भारताला पूर्णतः स्वतःच्या ताकदीवरच लढावे लागेल. कारण, आंतरराष्ट्रीय कूटनीतीत प्रत्येक राष्ट्र आपले हितसंबंध जपण्यावर भर देते. खर्याअर्थाने कोणतेही आपुलकीचेे नाते तेथे नसते.
उरी आणि पुलवामामध्ये पाकपुरस्कृत दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून सर्जिकल आणि एअरस्ट्राईक करण्यात आले होते. त्यानुसार पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत लष्करी कारवाई करणार याचा पाकिस्तानला अंदाज आलेला होता. म्हणूनच पाक-व्याप्त काश्मीरमधील दहशतवादी प्रशिक्षण शिबिरे तत्काळ रिकामी करण्याचे आदेश देण्यात आले होते. नियंत्रण रेषेवर हाय अलर्ट जारी करण्यात आला होता. पाकिस्तान सरकार आणि त्यांच्या फौजांनी बैठका बोलावलेल्या होत्या. दुसरीकडे, भारतीय लष्कराला पहलगामचा बदला घेण्यासाठी पूर्णपणे फ्री हँड म्हणजेच मोकळीक दिली आहे, असे खुद्द पंतप्रधान मोदी यांनी जाहीरपणे स्पष्ट केले होते. 6 मे 2025 च्या मध्यरात्री यशस्वीरीत्या राबवण्यात आलेले ‘ऑपरेशन सिंदूर’ हे त्याचेच फलित होते. भारताने कारवाई केल्यानंतर पाकिस्तानकडून त्यावर प्रतिक्रिया येणार हे स्पष्ट होते. त्यानुसार युद्धाला सुरुवात तर झालेली आहे. अशा निर्णायक स्थितीत प्रत्येक देश हा आपले हितसंबंध प्रथम पाहतो. ते लक्षात घेऊन हे युद्ध भारताला स्वबळावरच लढावे लागेल.
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानने भारताच्या सीमेवर तोफांचा मारा सुरू केला होता आणि भारतीय सैन्य त्याला तोडीसतोड प्रत्युत्तर देत आहे; पण त्यापलीकडे जाऊन पाकिस्तान काही तरी आगळीक करणार याची शक्यता होतीच. जेव्हा एक बाजू आक्रमणाची तीव्रता वाढवते, तेव्हा दुसर्या बाजूची प्रतिक्रियादेखील वाढणे अटळ असते. त्यानुसार पाकिस्तानने पंजाबच्या अनेक भागांमध्ये हल्ला करण्याचा प्रयत्न केला; मात्र भारतीय लष्कराने त्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरवले आहेत. उलट भारताने पाकिस्तानच्या तीन हवाई संरक्षण यंत्रणा (एअर डिफेन्स सिस्टीम) उद्ध्वस्त केल्या आहेत. यापैकी लाहोरजवळची ही हवाई संरक्षण यंत्रणा पाकिस्तानने चीनकडून विकत घेतली होती, ती पूर्णतः नष्ट करण्यात आली आहे. यातील एक एचक्यू 9 एअर डिफेन्स सिस्टीम नष्ट करण्यासाठी भारताने इस्रायली हार्पी ड्रोनचा वापर केला आहे. हार्पी ड्रोन हा एक पूर्णपणे मानवरहित हवाई यंत्र असून इस्रायली एअरोस्पेस इंडस्ट्रीजने तयार केलेला आहे. या ड्रोनमध्ये एकाच वेळी निरीक्षण आणि आक्रमण करण्याची क्षमता आहे. हे डिव्हाईस शत्रूच्या लक्ष्यावर सतत घिरट्या घालत राहते आणि योग्य वेळ येताच अचूकपणे लक्ष्यावर हल्ला करते. भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या अनेक एअर डिफेन्स सिस्टीम्स आणि रडार यंत्रणांवर लक्ष केंद्रित करून ती नष्ट केली आहेत.
पाकिस्तानने अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, भटिंडा, चंदीगड, कपूरथला, जालंधर, लुधियाना, अदमपूर, नल, फलोदी, उत्तरलाई आणि भुज या 15हून अधिक भारतीय लष्करी ठिकाणांवर ड्रोन व मिसाईलच्या माध्यमातून हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता; मात्र भारतीय हवाई संरक्षण यंत्रणांनी या सर्व कारवायांना वेळेत अडवून निष्फळ ठरवले. सध्याच्या घडीला भारतीय हवाई दलाकडे एकूण 2229 विमाने आहेत. यामध्ये सुमारे 600 लढाऊ विमाने (फायटर जेटस्), 899 हेलिकॉप्टर्स आणि 831 सपोर्ट एअरक्राफ्ट यांचा समावेश आहे. भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात राफेल, एसयू 30 एमकेआय आणि ‘नेत्र’ सर्व्हिलन्स विमान, निर्भय (लांब पल्ल्याचे क्रूझ मिसाईल), ब्राह्मोस, आकाश, रुद्रम यासारखी अत्याधुनिक उपकरणं आहेत, जी शत्रूंसाठी मोठा धोका ठरतात. त्यामुळे हवाई संरक्षण प्रणालीबाबतही भारत अत्यंत सक्षम आहे.
अलीकडेच भारताने रशियाकडून इग्ला एस मॅनपॅडस् प्राप्त केले आहेत. ही एक खांद्यावरून डागता येणारे पोर्टेबल एअर डिफेन्स मिसाईल सिस्टीम आहे. याची प्रभावी श्रेणी 6 किलोमीटरपर्यंत आहे आणि या श्रेेणीत येणार्या कोणत्याही शत्रूच्या हवाई लक्ष्याला हे सहजपणे निष्प्रभ करू शकते. हे सैनिकांना अधिक लवचिक आणि गतिशील संरक्षण क्षमतेने सज्ज करते. भारताचे स्वदेशी लढाऊ विमान तेजसदेखील हवाई दलाची एक प्रमुख ताकद आहे. हे जगातील सर्वात हलकं लढाऊ विमान मानलं जातं आणि त्याची कमाल गती 1850 कि.मी. प्रतितास इतकी आहे. आधुनिक युद्धात हलकं; पण गतिमान विमान असणे ही एक मोठी रणनीतिक गरज असते, जी तेजस पूर्ण करते. सांगण्याचा मुद्दा इतकाच की, पाकिस्तानशी प्रत्यक्ष युद्ध झाल्यास सामरिक सज्जतेबाबत भारत निश्चितच वरचढ आहे; पण युद्धासाठी आपण आपली संपूर्ण सेना सीमेवर आणली आहे का? आपण मानसिक, सामरिक, आर्थिकद़ृष्ट्या तयार आहोत का, याचा विचार होणे गरजेचे आहे. याचे कारण, आपली फौज देशभर पसरलेली आहे. याउलट पाकिस्तानची सेना सीमेजवळ असते. दुसरी गोष्ट म्हणजे, देशाचे सैन्य आणि सत्ताधारी युद्धासाठी तयार असतील, तर जनतादेखील तयार असायला हवी. जनतेने हे लक्षात ठेवायला हवे की, युद्ध म्हणजे टीव्हीवरील चर्चा किंवा सोशल मीडियावरील वाक्युद्ध नाही. प्रत्यक्ष युद्धाची मोठी किंमत मोजावी लागते. युद्धात आपल्याकडील सैनिकही शहीद होऊ शकतात. लढाऊ विमानांमधून होणार्या हल्ल्यांमुळे नागरी भागांतील सामान्य माणसांचे जीव जातात. घरे, रस्ते, इमारती, व्यावसायिक केंद्रे, रुग्णालये, सरकारी आस्थापना उद्ध्वस्त होण्याचा धोका असतो. या गोष्टी सांगण्यामागे भारताने युद्ध टाळावे हा हेतू नाही. यदाकदाचित युद्धाचा भडका उडालाच, तर जनतेनं त्या बलिदानासाठी सज्ज असले पाहिजे. आपण मानसिक तयारी ठेवायला हवी.
येथे सर्वांत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, आपण काही कारवाई करू आणि लगेच अमेरिका वा रशिया आपल्या बाजूने उभे राहतील, असे कुणाला वाटत असेल, तर तो पूर्णतः वेडगळपणा आहे. अमेरिका आधीच युक्रेन युद्धातून मागे सरकत आहे. रशियाने दहशतवादाविरोधात भारतासोबत असल्याचे म्हटले आहे; पण कोणत्याही देशाने पाकिस्तानला दोष दिलेला नाही किंवा त्यांच्यावर दबाव आणलेला नाही. अमेरिका भारताचा चांगला मित्र असला, तरी त्यांच्याकडूनदेखील थेट समर्थनाचं कुठलंही विधान आलेलं नाही. म्हणूनच युद्ध अधिक पेटलेच, तर ते भारताला पूर्णतः स्वतःच्या ताकदीवरच लढावे लागेल. कारण, आंतरराष्ट्रीय कूटनीतीत प्रत्येक राष्ट्र आपले हितसंबंध जपण्यावर भर देते. खर्याअर्थाने पाहिले तरी कोणतेही आपुलकीचे नाते तेथे नसते. त्यामुळे आपल्याला स्वतःच्या ताकदीवरच विश्वास ठेवावा लागेल. जागतिक कूटनीतीत इतरांवर अवलंबून राहून चालणार नाही. सध्याच्या घडीला असे म्हटले जाते की, पाकिस्तान इतका कमकुवत झालेला आहे की, अशी स्थिती यापूर्वी कधीच नव्हती; मात्र याबाबत फारसा विश्वास ठेवता येणार नाही. कारण, पडद्यामागे अनंत घडामोडी घडत असतात.