

राजेंद्र पाटील
नवी मुंबई: मुंबईसह उपनगर,नवी मुंबई, ठाणे,कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर, भिवंडी या शहरासह तालुक्यातील रेशनिंग दुकानातील गहू 'पलटी" मारून दुसर्या बारदानात भरून रायगडसह म्हैसूर आणि हुबळी येथील फ्लोअर मिलवर आठवड्यातून किमान दोन ते तीन वेळा तीस टनाप्रमाणे अपहार करून पाठवला जाणाऱ्या प्रकरणाचा छडा नवी मुंबई पोलिसांनी लावला.
३० ऑक्टोबर रोजी सीबीडी उड्डाण पुलाजवळ ३० टनाची गाडी पकडली. यात गामी आणि केपीचे नाव पुढे आले असून सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हे शाखेने सेंट्रल युनिटकडून केपीसह १५ जणांना नोटीस बजावल्या आहेत. केपी हा गुटखा, लॉटरीत किंग म्हणून ओळखला जातो. गुटखाबंदी असताना राज्यात अन्न औषध प्रशासन (एफडीए) कडून धाडी टाकून राज्यभरातून गुटखा जप्त केला जातो.
मात्र पोलिसांच्या नाकावर टिच्चून आणि कलेक्टरांच्या सहकार्याने केपी आजही महाराष्ट्रात गुटखा सप्लायर म्हणून परिचित आहे.
आजही गुटख्याची कंटेनर केपी ठाणे,भिवंडी, मुंबई, नवी मुंबई हद्दीत खाली करून गुटखा होलसेलने बाजारात उपलब्ध करून देतो. तो पोलीस दलातील तेही 'ठाण्यातील एकाच आयपीएस अधिकाऱ्याला जुमानतो.
त्यामुळे ठाणे पोलीस आयुक्तालयात केपीवर आतापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नाही, अशी चर्चा पोलीस दलात आहे.केपी मुंबईतील एका माजी खासदारांचा कट्टर समर्थक असल्याचे समजते. विश्वासू म्हणून त्याची त्यांच्याकडे ओळख आहे.
तो त्यांच्याकडे ड्रायव्हर म्हणून नोकरी करत होता. मात्र आज कोट्यधीश असलेल्या 'केपी" उर्फ पुजारी कुणालाच जुमानत नाही. त्यामुळे नवी मुंबईतील गुन्हेशाखेसह इतर अधिकाऱ्यांचा कलेक्टरची चोख भूमिका बजावणाऱ्या कलेक्टर ३० ऑक्टोबर रोजी सीबीडी बेलापूर उड्डाणपुलाखाली ३० टन गहू भरलेली गाडी अडवली.
यावेळी गुन्हे शाखेने चौकशी केल्यानंतर एपीएमसीतील काही व्यापाऱ्यांकडून विकत घेतल्याचे कागदपत्र सादर केले. विशेष म्हणजे सादर केलेल्या कागदपत्रात नामांकित ग व्हाचे वाण दाखवले. प्रत्यक्षात मात्र रेशनिंगचा गहू निघाला.
हा गहू अंधेरी उमोया स्टोअरवरून भरून म्हैसूर आणि हुबळीला रवाना करण्यात आला होता. हा गहू प्रवीण गिला गामी यांचा असल्याचे सांगण्यात आले. गामीचे दोन ते तीन जण मध्यस्थी करण्यासाठी आले होते.
मात्र तडजोड फिस्कटल्याचे समजते. याच मध्यस्थीने अखेर केपी उर्फ पुजारीचे नाव घेतल्याचे समजते. गुन्हे शाखेने या प्रकरणाची कुठेही वाच्यता होऊ नये याची विशेष काळजी घेतली होती. दरम्यान, गुन्हे शाखेतील सेंट्रल युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय शिंदे यांच्याशी दोन वेळा संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, तो होऊ शकला नाही.
रेशनिंगच्या गव्हाचा रेशनिंग दुकानातील चालकांच्या मदतीने गोदामात, रेशनिंग दुकानात किंवा एफसीआयच्या गोदामात बनावट बिले, माल उचल करण्याची कागदपत्रे सादर करून हा गहू पलटी मारुन रातोरात फ्लोअर मिलला पाठवला जातो.
यासाठी मुंबईतील सात, ठाणे चार, कल्याण, उल्हासनगर, डोंबिवली येथील तीन आणि नवी मुंबईतील दोन रेशनिंगची माहिती असणाऱ्या टोळ्या काम करतात. एकदा गाडीत माल भरल्यानंतर गाडी केवळ चालकावर ही जबाबदारी सोपविण्यात येते. बोगस कागदपत्रे त्याच्याकडे दिली जातात. याची सर्व माहिती रेशनिंग अधिकारी, भरारी पथक आणि मुख्य शिधावाटप कंट्रोलर मुंबई या विभागातील काही अधिकाऱ्यांना आहे.