

नवी मुंबई: नवी मुंबई शहरात पर्यावरणपूरक आणि प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन महापौर सुजाता पाटील आणि आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.
फटाक्यांमुळे होणारे वायुप्रदूषण आणि ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी नागरिकांनी फटाक्यांचा वापर टाळावा, तसेच पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन नवी मुंबई मनपातर्फे करण्यात आले आहे.
दिवाळीदरम्यान फटाक्यांमधून निघणाऱ्या विषारी वायूंमुळे हवेची गुणवत्ता खालावते. त्यामुळे नागरिकांना श्वसनासंबंधीच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, सामान्यतः ९१ असणारा हवा गुणवत्ता निर्देशांक दिवाळीदरम्यान फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे सरासरी २१२ पर्यंत वाढल्याचे निदर्शनास आले आहे.
बेरियम सॉल्ट, लिथियम, अर्सेनिक, शिसे आणि पारा यांसारखे घातक घटक असलेल्या फटाक्यांवर बंदी असल्याने नागरिकांनी अशा फटाक्यांचा वापर करू नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच १२५ डेसिबल (एआय) पेक्षा अधिक आवाज निर्माण करणाऱ्या फटाक्यांचे उत्पादन, विक्री आणि वापर बेकायदेशीर आहे.
न्यायालयीन निर्देशांनुसार नागरिकांना केवळ संध्याकाळी ७ ते रात्री १० या वेळेतच फटाके वाजवता येणार आहेत. फटाका विक्रेत्यांनी बंदी असलेल्या फटाक्यांची विक्री करू नये. परवानगी असलेल्या फटाक्यांची विक्रीही महापालिकेने निश्चित केलेल्या ठिकाणी आवश्यक परवानगी घेऊनच करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस प्रशासन आणि महापालिकेच्या संबंधित विभागीय सहाय्यक आयुक्तांनी दक्षता घ्यावी, असेही नमूद करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या ‘माझी वसुंधरा अभियान’, ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२६’ आणि ‘स्वच्छ वायू सर्वेक्षण’ अभियानांतर्गत पर्यावरणपूरक सण साजरे करण्यावर भर देण्यात येत आहे.
नागरिकांनी मातीचे दिवे आणि पणत्या लावाव्यात, प्लास्टिकऐवजी कागदी किंवा कापडी आकाशकंदील व पिशव्यांचा वापर करावा. झाडांवर विद्युत रोषणाई करणे टाळावे आणि पुनर्वापरयोग्य वस्तूंचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
फटाकेमुक्त, प्लास्टिकमुक्त आणि कचरामुक्त दिवाळी साजरी करून शहराच्या पर्यावरणाचे संरक्षण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासंदर्भातील सविस्तर सूचना मनपाच्या www.nmmc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.