

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांतील रुग्णांना पुरवण्यात येणाऱ्या आहारात खरोखरच बासमती तांदूळ दिला जातो का? त्याची गुणवत्ता कोण तपासते व निविदेतील दरानुसारच खाद्यपदार्थ पुरविले जातात का? असे सवाल नगरसेवकांनी बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत उपस्थित केले. रुग्णांना पातळ डाळ मिळते, अंडी दिली जात नसल्याच्या तक्रारी आहेत.
त्यामुळे आहाराच्या गुणवत्तेची खातरजमा करण्यासाठी ठेकेदारांच्या स्वयंपाकघरांची तपासणी, अचानक पाहणी व निकृष्ट आहार पुरविणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
महापालिकेच्या रुग्णालयांतील आहाराच्या कंत्राटासंदर्भातील चर्चेदरम्यान काँग्रेसच्या नगरसेविका अजंठा यादव यांनी बासमती तांदळाच्या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित केला. दर्जेदार वस्तूंचे दर गृहीत धरले जात असताना प्रत्यक्षात त्याच दर्जाच्या वस्तू रुग्णांना मिळतात का, याची तपासणी कोण करणार, असा सवाल त्यांनी केला.
शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेविका श्रद्धा जाधव यांनीही रुग्णांना बासमती तांदूळ दिला जातो का आणि त्यासाठीचे दर कसे निश्चित केले, याची माहिती मागितली. तर दीपमाला बढे यांनीही जेवणात फक्त बासमती तांदूळ वापरणार तर मग सर्व पदार्थ फक्त बासमतीचेच वापरणार का, असा प्रश्न उपस्थित केला.
शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेविका यामिनी जाधव यांनी रुग्णांच्या तक्रारींचा दाखला देत डाळ पातळ असते, अंडी मिळत नाहीत, अशा तक्रारींकडे लक्ष वेधले.महापालिका पूर्वी स्वतः आहार पुरवत असताना होणारा खर्च आणि सध्याच्या कंत्राटातील खर्च यांची तुलना करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
काँग्रेसचे नगरसेवक अशरफ आजमी यांनी तीन वर्षांत ५५ लाख रुग्णांना जेवण पुरवण्याच्या नियोजनाचा उल्लेख करत प्रतिरुग्ण १६ रुपयांच्या खर्चात दर्जेदार आहार कसा मिळणार, असा प्रश्न उपस्थित केला. जेवणाचे नमुने तपासावेत व अचानक भेटी देऊन गुणवत्ता पडताळावी, अशी मागणी त्यांनी केली. मनसेचे यशवंत किल्लेदार यांनी खाद्यपदार्थांचे प्रमाण, खर्च आणि दर निश्चितीचे निकष स्पष्ट करण्याची मागणी केली.
भाजपच्या प्रीती सातम व राजेश्री शिरवाडकर यांनी प्रत्यक्ष पाहणीवर भर दिला. शिवसेना ठाकरे गटाच्या मीनाक्षी पाटणकर यांनी दंडाची तरतूद करण्याची, तर यशोधन फणसे यांनी आहाराची गुणवत्ता व प्रमाण याबाबत खुलासा करण्याची मागणी केली.
अन्नाचे नमुने प्रयोगशाळेत तपासले जातात
अतिरिक्त आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीकडून मिळालेल्या दरांच्या आधारे वार्षिक सरासरी काढून निविदेचे दर निश्चित केल्याचे सांगितले. आहाराच्या गुणवत्तेच्या तपासणीसाठी अधिष्ठाता व आहारतज्ज्ञांची समिती असून, अन्नाचे नमुने प्रयोगशाळेत तपासले जातात, असेही त्यांनी स्पष्ट केले.