Mumbai Dust Control Drive: धूळमुक्त मुंबईसाठी दिवाळीपूर्वीच विशेष स्वच्छता मोहीम; महापालिकेकडून प्रत्येक प्रभागाला १५ लाखांचा निधी

हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी महापालिका सतर्क
Mumbai Dust Control Drive
Mumbai Dust Control DrivePudhari
Published on: 
Updated on: 

मुंबई: मुंबईतील रस्त्यांवरील धूळ कमी करून हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी मुंबई महापालिकेच्या वतीने दिवाळीपूर्वी विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे.

२८ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत सर्व प्रभागांमध्ये ही मोहीम राबविण्याचे निर्देश पालिका आयुक्तांनी दिले आहेत. या मोहिमेसाठी प्रत्येक प्रभागाला १५ लाख रुपयांचा निधी देण्यात येणार आहे.

महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने धूळमुक्त मुंबई मोहीम अभियानांसंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. हिवाळ्यातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासह रस्त्यांवरील धूळ आणि बांधकाम व पाडकामातून निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे (सी अँड डी वेस्ट) व्यवस्थापन करणे, हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे.

Mumbai Dust Control Drive
BMC Employees Bonus: मुंबई पालिका कर्मचाऱ्यांना ३३ हजार बोनस; गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा २ हजार रुपये वाढीचा निर्णय

प्रमुख रस्त्यांवर यांत्रिक सफाई

या मोहिमेत बीकेसी कनेक्टर, चेंबूर-सांताक्रूझ लिंक रोड (एससीएलआर), पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग, जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड (जेव्हीएलआर), घाटकोपर-माणखुर्द रोड, एस. व्ही. रोड, लिंक रोड, कार्टर रोड आणि सायन-मानखुर्द रोड या प्रमुख रस्त्यांवर स्वच्छता केली जाणार आहे.

रस्त्यांची झाडलोट आणि खरवडून सफाई करण्यासोबतच रस्त्यांचे दुभाजक, मधले पट्टे, वाहतूक बेटे, पदपथ आणि रस्त्यांच्या कडांची यांत्रिक पद्धतीने स्वच्छता केली जाणार आहे. रस्त्यांच्या कडेला साचलेली धूळ व गाळ हटवून त्याची योग्य विल्हेवाट लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Mumbai Dust Control Drive
Mumbai luxury home sales: मुंबईच्या आलिशान घरांचा बाजार तेजीत! सहा महिन्यांत ३२ हजार कोटींची विक्री

मोहिमेच्या अंमलबजावणीवर सहाय्यक आयुक्तांची देखरेख

अतिरिक्त यंत्रसामग्री आणि मनुष्यबळाची आवश्यकता तपासून त्यानुसार नियोजन करण्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. या मोहिमेच्या अंमलबजावणीवर सहाय्यक आयुक्तांनी देखरेख ठेवून कामाचे दस्तऐवजीकरण करण्याचे निर्देश महापालिकेने दिले आहेत.

मोहिमेअंतर्गत कोणत्या ठिकाणी किती स्वच्छता झाली, किती मनुष्यबळ व यंत्रसामग्री वापरली, किती धूळ आणि कचरा गोळा केला तसेच त्याची विल्हेवाट कशी लावली, याची दैनंदिन नोंद ठेवावी लागणार आहे. स्वच्छतेपूर्वी आणि नंतरची जीपीएस-आधारित छायाचित्रे व व्हिडिओही सादर करणे बंधनकारक असेल.

यंत्रसामग्री आणि मनुष्यबळ तैनात

स्वच्छता मोहिमेसाठी सफाई यंत्रे, धुके फवारणारी यंत्रे, पाण्याचे फवारे मारणारी वाहने, कचरा गोळा करणारी साधने, जेसीबी आणि डंपर यांचा आवश्यकतेनुसार वापर केला जाणार आहे. धूळ अधिक असलेल्या ठिकाणी पाण्याची फवारणी आणि मिस्टिंग करण्यात येणार आहे.

प्रत्येक प्रभागातील सहाय्यक अभियंत्यांनी संबंधित सहाय्यक आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली ठिकाणे निश्चित करून दिवसनिहाय कृती आराखडा तयार करायचा आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांना गणवेश, संरक्षक साधने आणि आवश्यक सुरक्षा उपकरणे देण्याचेही निर्देश आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news