

कोपरखैरणे: वाहन विम्याचे नूतनीकरण करून देण्याचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा आणि सायबर सेलने पर्दाफाश केला आहे.
महापे येथील बनावट कॉल सेंटरवर छापा टाकून पोलिसांनी प्रसाद तोडणकर, फैयाज नासीर आणि वैभव इंगळे या तीन मुख्य आरोपींना अटक केली आहे. या टोळीने अनेक वाहनधारकांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचे तपासात समोर आले आहे.
केंद्र सरकारच्या सायबर गुन्हे नियंत्रण कार्यक्रम आणि महाराष्ट्र सायबरकडून मिळालेल्या तांत्रिक माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. एनसीसीआरपी पोर्टलवर वाहन विम्याच्या नावाखाली पैसे उकळून पॉलिसी न दिल्याच्या १४५ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.
त्यानंतर करण्यात आलेल्या तांत्रिक विश्लेषणातून महापे येथील टेक्नोसिटी इमारतीत ‘लाइफ डील’ आणि ‘एआय ओशन एंटरप्रायझेस’ या नावाने बनावट कॉल सेंटर चालवले जात होते.
८ सिमकार्ड, २६ मोबाईल फोन, २७ हार्ड डिस्क आणि ५ लॅपटॉप जप्त
पोलिसांनी छापा टाकला असता तेथे ३२ युवक-युवती एजंट म्हणून काम करत असल्याचे आढळले. घटनास्थळावरून ८ ऍक्टिव्ह सिमकार्ड, २६ मोबाईल फोन, २७ हार्ड डिस्क आणि ५ लॅपटॉप जप्त करण्यात आले.
या सिमकार्डच्या माध्यमातून सुमारे १४ लाख ८ हजार १२१ रुपयांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले असून, या प्रकरणी नवी मुंबई सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या रॅकेटमध्ये आणखी काही आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता असून, तपास सुरू आहे, अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.