

मुंबई: मूळ मुंबईकर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोळी बांधवांना रोजगार मिळावा व त्यातून कोळीवाड्यांमध्ये पर्यटन स्थळ विकसित व्हावे, यासाठी शहरातील महत्त्वाच्या कोळीवाड्यांमध्ये राज्य सरकार व मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून 'होम स्टे' ही संकल्पना राबवण्यात येणार आहे. त्यामुळे देशी विदेशी पर्यटकांना कोळी समाज व कोळीवाड्यातील राहणीमान व येथील खाद्य संस्कृतीची माहिती करून घेणे शक्य होणार आहे.
मुंबईची मूळ ओळख आणि संस्कृती पारंपरिक कोळीवाड्यांमध्ये दडलेली आहे. जागतिक स्तरावर मुंबईची ओळख एक आधुनिक आर्थिक राजधानी म्हणून असली तरी, देश-विदेशातील पर्यटकांना कोळी बांधवांच्या पारंपारिक घरांमध्ये राहण्याची, त्यांची जीवनशैली जवळून पाहण्याची आणि अस्सल कोळी खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्याची तसेच, मुंबईची अस्सल, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक बाजू अनुभवण्याची तीव्र इच्छा असते.
त्यामुळे कोळीवाडा पर्यटनाचे केंद्र बनवण्याची संकल्पना राज्य सरकारने दोन वर्षापूर्वी अमलात आणली होती. तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी या संकल्पनेला वेग देण्याचा प्रयत्न केला. आता मुंबईतील नगरसेवकांनी कोळीवाड्यांच्या पर्यटन स्थळासाठी पुढाकार घेतला आहे.
मुंबई महानगरपालिकेमध्ये कोळीवाड्यांमध्ये होम स्टेसह तेथील खाद्य संस्कृतीला चालना देण्यासाठी नगरसेवक रुपेश सावरकर यांनी महापालिका सभागृहात ठरावाची सूचना मांडली आहे. हा ठराव मंजूर झाल्यानंतर कोळीवाडे पर्यटन स्थळ विकसित करण्यात येणार आहे. त्यामुळे पर्यटकांना कोळीवाड्यामध्ये येऊन येथील संस्कृतीचा अभ्यास करणे शक्य होणार आहे.
पहिला सी-फूड प्लाझा माहीम येथे कोळी बांधव व महिलांचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टिकोनातून महिला बचत गटामार्फत चालविण्यात येणार्या पहिला सी-फूड प्लाझा माहीम येथे सुरू करण्यात आला. कोळी भगिनींनी बांगडा, सुरमई, पापलेट, सरंगा, कोलंबी, माकुल, खेकडा व अन्य मच्छीपासून बनवलेल्या विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद मुंबईकर घेत आहेत.
यासाठी समुद्रकिनारी तंबूंची व्यवस्था करण्यात आली आहे. याठिकाणी नागरिकांना कोळी खाद्यपदार्थांसोबत कोळी नृत्याचाही आनंद घेता येतो. याच धर्तीवर मुंबईतील अन्य कोळीवाड्यात सी फूड प्लाझासह कोळीवाडा परिसराचे सौंदर्यकरण करण्यात येणार आहे.
सांस्कृतिक केंद्र उभारणार
समुद्रालगत सांस्कृतिक केंद्र उभारण्यासह येथे कोळी वाड्यातील तरुणांना संगीत व अन्य क्षेत्रातील प्रशिक्षण देणे, शैक्षणिक व क्रीडा उपक्रम राबवणे, कोळीवाड्यातील वेशभूषा व मच्छी मारण्यासाठी लागणाऱ्या साहित्याचे प्रदर्शन, यात मासेमारीच्या जाळ्यासह छोट्या बोटी, मासळीच्या टोपल्या, मच्छी मारण्याची अन्य साधने, कोळी पेहराव असलेले फायबरचे पुतळे व अन्य वस्तूंचा समावेश असणार आहे.
मासळीची दुर्गंधी कमी करणार !
समुद्राच्या लगत वसलेल्या कोळीवाड्यांच्या अस्वच्छतेबद्दल अनेकांनी लक्ष वेधले होते. समुद्रालगत विविध प्रकारची मासळी सुकवण्यात येते. त्याशिवाय दररोज ताजी मच्छी घेऊन येणाऱ्या बोटीमुळे येते मच्छीची मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरते. त्यामुळे सामान्य माणूस फारसा कोळीवाड्यांकडे फिरकत नाही.
मात्र कोळीवाड्यांचा पर्यटन म्हणून विकास करताना, सुरुवातीला अस्वच्छतेची ओळख पुसण्यात येणार आहे. मच्छीची येणारी दुर्गंधी कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. यासाठी कोणत्या उपाययोजना हाती घेता येतील, याचा अभ्यास करण्यात येणार आहे.