

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या 28 प्रभागात पहिल्यांदाच पॅनल पद्धतीने 111 नगरसेवकपदासाठी 500 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. 27 प्रभागांत चार उमेदवारांचे तर 28 क्रमांकाच्या प्रभागात तीन सदस्य पॅनल असणार आहे. आज सकाळी 7.30 ते सायं. 5.30 या वेळेत मतदान होणार असून 9,48,460 मतदार 1,148 मतदान केंद्रांवर आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यासाठी बुधवारी आठ विभागांतील मतदान केंद्रांसाठी साहित्य वाटप करण्यात आले.
प्रत्येक केंद्राच्या बाहेर वोटर अस्टिन्टन्ट बूथ लावले असून तेथे संबंधित बीएलओ हे मतदारांना सहाय्य करणार आहेत. मतदान केंद्रांवर मतदारांना सहाय्यासाठी 250 हून अधिक स्वयंसेवक कार्यरत असणार आहेत. मतदान केंद्रावर मोबाईल वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. चुकून सोबत आणला असल्यास तो बाहेर ठेवण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर मोबाईल लॉकर पाऊच व्यवस्था केली आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने सर्व मतदान केंद्रांचे वेबकास्टिंग मतदान केंद्रे व परिसर 1250 सीसीटिव्हीद्वारे सुरक्षित केले आहेत. त्यावर महानगरपालिका मुख्यालय, संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी व पोलीस आयुक्तालय येथून थेट देखरेख ठेवली जाणार आहे.
निवडणुकीसाठी 185 ठिकाणांवर 1148 मतदान केंद्रे स्थापन करण्यात आलेली आहेत. मतदान केंद्रावरील कामकाजाकरिता मतदान केंद्राध्यक्ष, 3 मतदान केंद्र अधिकारी व शिपाई अशा एकूण 6890 कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. आज 15 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया संपन्न झाल्यानंतर त्याच ठिकाणी मतदान साहित्य जमा होणार आहे. या सर्व कार्यालयामधील स्ट्राँग रुममध्ये कडक पोलीस बंदोबस्तात मतदान यंत्रे सिलींग करून ठेवली आहेत. 16 जानेवारी रोजी या आठ निवडणूक निर्णय कार्यालयाच्या ठिकाणी सकाळी 10 पासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. त्यासाठी स्वतंत्र मतमोजणी अधिकारी, कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आलेली आहे व त्यांचे प्रशिक्षणही पूर्ण झालेले आहे. 15 जानेवारी गुरुवारी सर्व नवी मुंबईकर नागरिकांनी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत आपला मतदानाचा हक्क बजावावा आणि शहर विकासात आपले योगदान द्यावे, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी केले आहे.