

Navi Mumbai Municipal Election 2026 :
नवी मुंबई: नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण 'हाय व्होल्टेज' झाले आहे. भाजपचे दिग्गज नेते आणि मंत्री गणेश नाईक यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. "सिडको प्रशासनात बिल्डरांचे दलाल बसले असून, भूखंड बिल्डरांच्या खिशात घातले जात आहेत," असा गंभीर आरोप नाईकांनी केला आहे.
जाहीर सभेत बोलताना नाईक म्हणाले की, "कोविडच्या भीषण संकटात नवी मुंबईत येणारी औषधे आणि इंजेक्शन्स लंपास करण्यात आली. इतकेच नाही तर रबाळे एमआयडीसीमध्ये आपल्या हॉस्पिटलसाठी तयार होणारा ऑक्सिजन गॅसही चोरून नेला गेला. औषधं चोरली, गॅस चोरला आणि पाणीही चोरलं."
नवी मुंबईत शिवसेना शिंदे गटाने शहरात जोरदार बॅनरबाजी आहे. नवी मुंबईच्या विविध भागात 'नवी मुंबई, नवं सरकार' या आशयाचे बॅनर झळकले आहेत. हुकूमशाही संपवणार, नवी मुंबई नवकार!, भ्रष्टाचार मुक्त कारभार, नवी मुंबई नव सरकार!, लाडक्या बहिणींचा तारणहार, नवी मुंबई नव सरकार!, हक्काच्या घराचे स्वप्न साकार, नवी मुंबई नव सरकार! या बॅनरच्या माध्यमातून गणेश नाईक यांच्या वर्चस्वाला आव्हान देण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडून होताना दिसत आहे.