

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतून शुक्रवारी 269 उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे महापालिकेच्या रिंगणात 499 उमेदवार उरले असून यात दीडशेहून अधिक अपक्ष आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व्हाईट हाऊसला दिवसभर ठाण मांडून होते. बंडखोर उमेदवारांचे मन वळविण्यात त्यांना काही अंशी यश आल आहे. भाजप आमदार मंदा म्हात्रे यांची नाराजी दूर करण्यात किती यश येते याकडे लक्ष लागून आहे.
भाजपचे राजू शिंदे (माजी आरोग्य सभापती),अमशनिल कौशिक ( माजी उपमहापौर) आणि माजी नगरसेविका स्नेहा पालघर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले, तर शिंदेसेनेत माजी नगरसेवक संजू वाडे यांच्यासह प्रियांका शिंदे, राजू गावडे, सागर घोडके यांनी एका ठिकाणाहून माघार घेतली, तर दुसऱ्या प्रभागातील उमेदवारी कायम ठेवली आहे. बिपिन तायडे, वत्सला कांबळे, रेखा कांबळे आणि सचिन कांबळे यांनी माघार घेतली आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने हस्तक्षेप करत अशा बंडखोर उमेदवारांना समज देत पक्षशिस्तीचा दाखला देत अर्ज मागे घेण्यासाठी भविष्यातील संधी, पदे किंवा आश्वासने दिली आहेत.
अपक्षांची डोकेदुखी कायम
काही प्रभागांमध्ये ताकदवान अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात उतरल्याने प्रमुख पक्षांची डोकेदुखी वाढली होती. त्यांना निवडणुकीपासून दूर ठेवण्यासाठी पक्षांकडून साम, दाम, दंड, भेद अशा विविध राजकीय डावपेचांचा वापर केल्याचीही चर्चा असून, त्यातून अनेक अपक्षांनी माघार घेतली तरीही सुमारे दीडशे अपक्ष निवडणूक रिंगणात आहेत.