

मुंबई : मुंबई महापालिका निवडणूकीसाठी मतदारांमध्ये जनजागृती व्हावी, मतदानाचा टक्का वाढावा यासाठी ‘मतदारांचे सुनियोजित शिक्षण आणि निवडणूक सहभाग’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. राज्य निवडणूक आयोगाने 12 जून रोजी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार मतदार जागृतीसाठी महापालिकेकडून कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार विविध विभाग, अधिकारी व यंत्रणांमार्फत नियोजनबद्ध अंमलबजावणी सुरू आहे.
या निवडणुकीत 1 कोटी 3 लाख 44 हजार 315 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या सर्व मतदारांना आपल्या मताचे महत्त्व कळावे, प्रत्येक मतदाराने निर्भयपणे, प्रलोभनाला बळी न पडता दिनांक 15 जानेवारी रोजी मतदान करावे, यासाठी महापालिकेकडून जनजागृती अभियान राबविण्यात येत आहेत. या अभियानासाठी विविध माध्यमांचा समर्पकपणे वापर करण्यात येत आहे.
मतदारांमध्ये जनजागृती व्हावी,या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिलेले डिजिटल पोस्टर्स, बॅनर्स, चित्रफिती महानगरपालिकेने परवानगी दिलेल्या डिजिटल होर्डिंग्स, महानगरपालिकेच्या 24 नागरी सुविधा केंद्रांमधील स्क्रीन तसेच मध्य व पश्चिम रेल्वे, मेट्रो रेल्वे, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आदी प्राधिकरणांमार्फत प्रदर्शित करण्यात येत आहेत.
शाळांमध्ये चित्रकला, निबंध स्पर्धा, स्वच्छता वाहनांद्वारेही संदेश प्रसारित, सोसायटींमध्ये सूचना फलकांवर मतदानाचा संदेश, आकर्षक सेल्फी पाईंट, चित्रपटगृहात चित्रफीत प्रदर्शित, नभोवाहिणींवरूनही माहिती, ‘माझं मत नॉट फॉर सेल’, सुप्रसिद्ध व्यक्तींकडून संदेश, फ्लॅशमॉबचा अभिनव उपक्रम.