

मुंबई : अमेरिकेने व्हेनेझुएलावर केलेल्या हल्ल्यानंतर जागतिक अस्थिरतेत भर पडली आहे. भारतावरही अतिरिक्त अमेरिकन शुल्कवाढीची तलवार टांगती असल्याने गुंतवणूकदारांमध्ये नकारात्मक वातावरण आहे. त्याचा परिणाम सलग तिसऱ्या सत्रात शेअर निर्देशांक घसरणीत झाला. सेन्सेक्स 102 आणि निफ्टीत 37 अंकांनी घट झाली.
मुंबई शेअर बाजारात (बीएसई) सेन्सेक्स 0.12 टक्क्यांच्या घसरणीसह 84,961 अंकांवर आला. गत तीन सत्रांत मिळून सेन्सेक्स 800 अंकांहून अधिक खाली आला आहे. राष्ट्रीय शेअर बाजारात (एनएसई) निफ्टी निर्देशांक 0.14 टक्क्यांनी घटून 26,140 अंकांवर आला. गत तीन सत्रांत मिळून निफ्टीत 187 अंकांनी घट झाली आहे. बीएसईतील 4,350 पैकी 2,104 कंपन्यांच्या शेअर भावात वाढ झाली असून, 2 हजार 68 कंपन्यांच्या शेअर भावात घसरण झाली. डिक्सन टेक्नोलॉजी, कोहान्स लाइफसायन्सेस आणि ॲफकॉन इन्फास्ट्रक्चरच्या शेअर भावाने 52 सप्ताहातील नीचांकी कामगिरी नोंदवल्याने सेन्सेक्सचे नुकसान झाले.
निफ्टी-50 निर्देशांकातील 30 कंपन्यांच्या शेअर भावात घट झाली. सिप्ला 4.28, मारुती सुझुकी 2.81 आणि टाटा मोटर पॅसेंजर व्हेईकलच्या शेअर भावात 1.60 टक्क्यांनी घसरण झाल्याने निफ्टीचे नुकसान झाले. टायटन कंपनीच्या शेअर भावात 3.94 टक्के, एचसीएल टेक्नोलॉजीज 2.36 आणि विप्रोच्या शेअर भावात 1.79 टक्क्यांनी वाढ झाल्याने निफ्टीच्या घसरणीला आळा बसला. निफ्टी ऑटो निर्देशांक 0.80 टक्के, बँक 0.21 आणि फायनान्शियल सर्व्हिसेस निर्देशांकात 0.33 टक्क्यांनी घट झाली. निफ्टी आयटी निर्देशांक 1.87, कंझ्युमर ड्युरेबल्स निर्देशांकात 1.69 टक्क्यांनी वाढ झाली.