Navi Mumbai Civic Issues
नवी मुंबई : नवी मुंबईत शहरातील बहुतांश पथपथ गॅरेज वाल्याने बळकावल्याचे चित्र आहे. त्यामुळे पादचार्यांना रस्त्यावरून चालावे लागत आहे. पदपथावर दुकाने, रस्त्यावर दुरुस्ती अशी चित्र अनेक ठिकाणी आहे. यावर महापालिका तात्पुरती कारवाई करते. मात्र पुन्हा तेच चित्र पहावयास मिळत आहे.
वाशी सेक्टर 17, कोपरखैरणे, जुहूगाव, नेरुळ डी. वाय. पाटील समोर तसेच सेक्टर 13, बेलापूर व घणसोली नोड यासह पाम बीच मार्गाचाही त्यात समावेश आहे.
त्यांची ही दुकाने बेकायदा सुरू आहे. रहदारीला अडथळा होत आहे. असे असताना प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी येणारी चारचाकी तसेच दुचाकी वाहने रस्त्यालगत अथवा फुटपाथवर उभी केली जात आहेत. त्यापैकी नादुरुस्त वाहनांचे भंगार वर्षानुवर्षे रस्त्यालगतच साठवले जाते. काही ठिकाणी पालिका व वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जाते, मात्र पुन्हा त्या ठिकाणी गॅरेजची दुकाने थाटल्याचे पाहायला मिळत आहे. या अनधिकृत गॅरेजमुळे वाशी पामबीच मार्ग, एपीएमसीत वाहतूककोंडीची समस्या वाढली आहे.
रस्त्यावर तसेच पदथावर गॅरेज चालकांनी अतिक्रमण केलेले असल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येत असते असे महापालिकेचे अतिक्रमण विभागाचे उपायुक्त भागवंत डोईफोडे यांनी सांगितले.
पदपथावरच गॅरेज चालक हे त्यांचे बस्तान मांडून बसत असल्यामुळे रस्त्यांने चालणे देखील जिकिरीचे होत आहे. पदपथ तसेच रस्त्यावर देखील त्यांनी हातपाय पसरले आहेत. वाहतुकीस देखील अडथळा निर्माण होत आहे.
संतोष धनावडे पादचारी
गॅरेज चालक हे रस्त्यावरच बेशिस्तपणे वाहन पार्किग करुन वाहन दुरुस्तीचे काम करतात. यामुळे वाहतुककोंडी देखील होत आहे. तर रहदारी वसाहतमध्ये असणार्या ठिकाणी गॅरेज चालकांमुळे होणार्या आवाजामुळे देखील त्रास सहन करावा लागतो.
राजेंद्र जोशी, वाहनचालक