

Mumbai Police Digital Identity
मुंबई : पोलीस अधिकारी व कर्मचार्यांच्या बनावट ओळखपत्राच्या आधारे नागरिकांना धमक्या देणे किंवा फसवणूक करणार्या गुन्हेगारी कृत्याला आळा घालण्यासाठी मुंबई पोलीस दलातील अधिकारी व कर्मचार्यांना डिजिटल स्मार्ट ओळखपत्र दिले जाणार आहे.
हा प्रयोग सुरुवातीला फक्त मुंबई क्षेत्रापुरता राबविला जाणार असून, पोलीस आयुक्तांपासून ते पोलीस शिपायांपर्यंत सर्वांना हे नवीन स्मार्ट कार्ड मिळणार आहे. डिजिटल ओळखपत्रासाठी लागणार्या चार कोटी रुपयांच्या प्रशासकीय अंदाजपत्रकास गृह खात्याने गुरुवारी मंजुरी दिली.
मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले अधिकारी, कर्मचार्यांना सध्या छापील ओळखपत्र देण्यात आले आहे. कोणत्याही डीटीपीच्या साहाय्याने त्याचे बनावट ओळखपत्र तयार केले जाऊ शकते. अशा बनावट कार्डाचा वापर करून नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.
विशेष म्हणजे, अलीकडच्या काळात सायबर गुन्ह्यांच्या माध्यमातून बनावट ओळखपत्राचा वापर करून ‘डिजिटल अरेस्ट’चे प्रकार वाढू लागले आहेत. यासाठी पोलिसांना डिजिटल स्मार्ट ओळखपत्र देण्याबाबतचा प्रस्ताव गृह विभागाकडे पाठवण्यात आला होता. त्याला गृह विभागाने मंजुरी दिली आहे.
मुंबई पोलिस दलाच्या आस्थापनेवर अधिकारी-कर्मचार्यांची मिळून 51 हजार 308 पदे मंजूर आहेत. या सर्वांना डिजिटल स्मार्ट ओळखपत्र दिले जाणार आहेत. पोलिसांना असे स्मार्ट ओळखपत्र देणारे मुंबई पोलीस आयुक्तालय हे पहिले शासकीय कार्यालय ठरणार आहे. हे कार्ड स्टील स्वरूपात असेल. त्यावर पोलिसांचे छायाचित्र, क्यूआर कोड आणि त्यामध्ये छोटी चीप असणार आहे. कार्डावरील क्यूआर कोड मोबाईलवरून स्कॅन केल्यास संबंधित अधिकारी व कर्मचार्यांची सर्व माहिती एका क्षणात मिळेल.