

नवी मुंबई: नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण तापले असून पक्षप्रवेश, शक्तीप्रदर्शन आणि अंतर्गत गणिते यामुळे निवडणूक रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेस तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील अनेक माजी नगरसेवकांनी शिवसेना शिंदे सेनेत प्रवेश केल्याने स्थानिक राजकारणाची समीकरणे झपाट्याने बदलत आहेत. यामुळे आगामी निवडणुकीत महापौरपदासाठी थेट लढत ही शिवसेना शिंदे सेना आणि भारतीय जनता पार्टी यांच्यातच होणार असल्याचे चित्र स्पष्ट होत चालले आहे.
शिवसेना शिंदे सेनेने अलीकडच्या काळात केलेले पक्षप्रवेश हे केवळ संख्याबळापुरते मर्यादित नसून, त्यामागे आगामी निवडणुकीसाठीची ठोस रणनीती असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. रविवारी ऐरोली येथे झालेल्या शिंदे सेनेच्या भव्य मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे जिल्हाध्यक्ष नामदेव भगत यांच्यासह दोन माजी नगरसेवकांनी पक्षप्रवेश केल्याने या पक्षाची ताकद अधिक वाढली आहे. या प्रवेशांमुळे शिवसेना शिंदे सेनेकडे आता तब्बल 54 माजी नगरसेवकांची फौज उभी राहिली आहे.
विशेष बाब म्हणजे भारतीय जनता पार्टीकडे देखील सध्या 54 माजी नगरसेवकांची संख्या आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष जवळपास समान बळावर असून, सत्तेसाठीची चुरस अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेत सत्ता स्थापनेसाठी 56 नगरसेवकांचा जादुई आकडा गाठणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे सेना आणि भाजप या दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे किमान 60 नगरसेवक निवडून आणण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे.
गेल्या 25 वर्षांपासून नवी मुंबई महानगरपालिकेवर गणेश नाईक यांचे वर्चस्व राहिले आहे. त्या एकहाती सत्तेला सुरुंग लावण्यासाठी शिवसेना शिंदे सेना सज्ज झाली असून, संघटनात्मक बांधणी, इच्छुक उमेदवारांच्या चाचपण्या आणि प्रभागनिहाय रणनीती आखण्यात पक्षाने आघाडी घेतल्याचे दिसून येते. भाजपकडूनही बूथ पातळीपर्यंत मजबूत यंत्रणा उभारण्यावर भर दिला जात आहे.
महायुतीच्या भवितव्याबाबत मात्र अद्यापही संभ्रम कायम आहे. महायुती झाल्यास भाजप आणि शिंदे सेना यांच्यात समसमान जागावाटपाचा फॉर्म्युला राबविला जाऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र, जागावाटपावर एकमत न झाल्यास दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवतील.