

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची धामधूम आता लवकरच सुरू होणार असून यावेळी महापौरपदाची लॉटरी कुणाला लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावेळी चक्रानुक्रमाने लॉटरी काढण्यात येणार नसून आठवडाभरात नव्याने लॉटरी काढण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या निवडणूक विभागाच्या सूत्रांनी दिली.
मुंबई महानगरपालिकेमध्ये महापौरपद सर्वोच्च आहे. देशाच्या आर्थिक राजधानीचा कारभार सांभाळणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या सर्वोच्च पदावर बसण्यासाठी सर्व नगरसेवक उत्सुक असतात. पण आरक्षणामुळे काहींना ते शक्य होत नाही. 1998 पासूनचे महापौर आरक्षण लक्षात घेता खुल्या प्रवर्गातील नगरसेवकांना 5 वेळा महापौरपदाची संधी मिळाली होती. परंतु शिवसेनेने 2017 व 2020 मध्ये खुल्या प्रवर्गातील नगरसेवकांना महापौर बनण्याची संधी दिली नाही. दोन्ही वेळा ओबीसी नगरसेवक महापौरपदी विराजमान झाले. यात दिवंगत विश्वनाथ महाडेश्वर यांच्यासह किशोरी पेडणेकर यांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे 2020 मध्ये खुला प्रवर्ग असताना महिला ओबीसी असलेल्या किशोरी पेडणेकर यांना महापौरपदी बसवण्यात आले. त्यामुळे खुल्या प्रवर्गातील नगरसेवक नाराज झाले.आतापर्यंत महापौर पदाची लॉटरी चक्रानुक्रमानुसार काढण्यात आली. मात्र आता प्रभाग आरक्षणाप्रमाणे नव्याने आरक्षण काढण्यात येणार आहे. त्यामुळे महापौरपद नेमक्या कोणत्या आरक्षणामध्ये जाईल, याचा अंदाज बांधणे शक्य नसल्याचे पालिकेच्या निवडणूक विभागाचे म्हणणे आहे.
1998 ते 2020 महापौरचे आरक्षण
1998 ओबीसी - नंदू साटम
1999 सर्वसाधारण - हरेश्वर पाटील
2002 एससी - महादेव देवळे
2004 सर्वसाधारण - दत्ता दळवी
2007 ओबीसी महिला - डॉ. शुभा राऊत
2009 सर्वसाधारण महिला - श्रद्धा जाधव
2012 सर्वसाधारण - सुनील प्रभू
2014 एस सी महिला - स्नेहल आंबेकर
2017 सर्वसाधारण - विश्वनाथ महाडेश्वर
2020 सर्वसाधारण - किशोरी पेडणेकर