

नवी मुंबई : देशांतर्गत उड्डाणाला मोठा प्रतिसाद मिळाल्यानंतर आता नवी मुंबई विमानतळावरून मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून 46 देशांमध्ये आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होणार आहे. त्याचबरोबर या विमानतळावरून देशातील प्रमुख शहरांमध्ये 30 नवीन देशांतर्गत मार्गांचाही विस्तार करण्यात आला आहे.
या वेळापत्रकात 30 नवीन देशांतर्गत मार्ग जोडले गेले आहेत, जे भारतातील व्यावसायिक, पर्यटन आणि धार्मिक केंद्रांशी जोडतील. दिल्ली (9), गोवा (7), बंगळुरू (6) आणि कोचीन (5) कडे सर्वाधिक दैनंदिन उड्डाणे असतील. त्यानंतर हैदराबाद, कोलकाता, लखनऊ, वाराणसी आणि इंदूरचा क्रमांक लागतो.
नवीन वेळापत्रकाच्या गरजेनुसार इंडिगो, आकासा एअर आणि एअर इंडिया एक्स्प्रेस या तीन भारतीय विमान कंपन्या विमानतळावरून अतिरिक्त उड्डाणे चालवतील, ही विमान उड्डाणे दर आठवड्याला 1,092 इतकी भरण्याची अपेक्षा आहे, ज्याची सरासरी दररोज 156 हालचाली इतकी असेल.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या संदर्भात सिडको व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी माहिती देताना सांगितले की, नवी मुंबई विमानतळावरून 25 डिसेंबरपासून विमानसेवा सुरू झाली असून सध्या दररोज सुमारे 160 विमानांची ये-जा सुरू आहे. एका दिवसामध्ये सुमारे 22 हजार प्रवासी या विमानतळाचा लाभ घेत असून, अपेक्षेपेक्षा जास्त चांगला प्रतिसाद मिळत आहे. तिसरी धावपट्टी उभारण्याचे नियोजन सुरू आहे.
सध्या दोन धावपट्ट्यांचे नियोजन असताना, वाढता प्रतिसाद पाहून तिसरी धावपट्टी उभारण्याची मागणी होत आहे. यासाठी तांत्रिक आणि आर्थिक व्यवहार्यता तपासण्यासाठी कन्सल्टंटची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील 3 ते 4 महिन्यांत कन्सल्टंटचा अहवाल आल्यावर यावर अंतिम निर्णय घेतला जाईल. तिसरी धावपट्टी झाल्यास विमानतळाची प्रवासी क्षमता वार्षिक 9 कोटींवरून 13.5 कोटींपर्यंत वाढू शकते.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर दरवर्षी 9 कोटी (90 दशलक्ष) प्रवाशांना हाताळण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. या विमानतळावर दोन समांतर धावपट्ट्या (रनवे), अत्याधुनिक टर्मिनल इमारती आणि प्रगत मालवाहतूक (कार्गो) सुविधा असतील, सुरुवातीच्या टप्प्यात, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळमध्ये वार्षिक 2 कोटी (20 दशलक्ष) प्रवासी आणि 0.5 दशलक्ष मेट्रिक टन माल व्यवस्थापित करण्याची क्षमता असेल.
नवे 30 देशांतर्गत मार्गही होणार सुरू
आग्रा
औरंगाबाद
अयोध्या
बागडोगरा
बरेली
बेळगाव
भावनगर
भोपाळ
चंदीगड
डेहराडून
दीव
दुर्गापूर
गोवा (दाबोलीम)
गोरखपूर
हिंडन
हिरासर (राजकोट)
हुबळी
जबलपूर
जम्मू
झारसुगुडा
कन्नूर
कोल्हापूर
मदुराई
कोलकाता
पाटणा
रायपूर
श्रीनगर
तिरुपती
त्रिवेंद्रम
विशाखापट्टणम