

दिलीप शिंदे
ठाणे: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमानसेवेचा वेगाने विस्तार होत आहे. विमान कंपन्यांनीही आपल्या सेवा वाढवल्याने या विमानतळावरून आता दररोज 156 विमानांची उड्डाणे होऊन देशांतर्गत 46 शहरे जोडली जातील. या प्रकल्पांमुळे प्रवासी वाहतुकीसोबत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि त्याभोवती विकसित होत असलेली तिसरी मुंबईच्या विकासाला अधिक चालना मिळून ठाणे आणि मुंबईच्या अर्थव्यवस्थेची दिशा बदलत रोजगारावर दूरगामी व अतिशय सकारात्मक झालेला परिणाम पाहायला मिळेल.
उन्हाळ्यातील प्रवाशांचा वाढता प्रतिसाद पाहून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने (एनएमआयए) एप्रिल 2026 साठी आपला उन्हाळी उड्डाण आराखडा जाहीर केला असून, त्याअंतर्गत विमानसेवेचा मोठा विस्तार करण्यात आला आहे. 25 डिसेंबर 2025 रोजी व्यावसायिक सेवा सुरू झाल्यानंतर आता एनएमआयए हे विमानतळ देशांतर्गत हवाई कनेक्टिव्हिटीचे एक प्रमुख केंद्र बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.
नव्या आराखड्यानुसार इंडिगोने 23 एप्रिलपर्यंत 30 हून अधिक नवीन मार्गांची भर घातल्याने उड्डाणांची संख्या प्रति आठवडा अंदाजे 1,092 पर्यंत वाढेल, म्हणजेच दररोज सरासरी 156 उड्डाणे होतील. विमानतळ सुरु झाले तेव्हा दररोज 22 उड्डाणे होती, ती वाढून दररोज 78 उड्डाणे होण्याची अपेक्षा आहे.
हे विमानतळ आता देशातील 46 शहरांना जोडले जाणार असून 30 नवीन मार्ग 23 एप्रिलपर्यंत टप्प्याटप्प्याने सुरू होतील. या विस्ताराद्वारे नवी मुंबई आता आग्रा, अयोध्या, बागडोगरा, चंदीगड, कोलकाता, पाटणा, श्रीनगर, वाराणसी, विशाखापट्टणम औरंगाबाद, बरेली, बेळगाव, भावनगर, भोपाळ, चंदीगड, डेहराडून, दीव, गोवा, गोरखपूर, हिंडन, जबलपूर, राजकोट, जम्मू, कन्नूर, कोल्हापूर, मदुराई, रायपूर, तिरुमझा, विरुमपती आणि त्रिगुंधा ही शहरे जोडली जाणार आहेत.
या नवीन विमानसेवेमुळे मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) आणि देशातील इतर राज्यांमधील व्यापार, पर्यटन आणि दळणवळणाला मोठी गती मिळण्याची अपेक्षा आहे. तसेच देशांतर्गत सेवा स्थिरावल्यामुळे आणि पायाभूत सुविधांचा विस्तार झाल्यामुळे आता 2026 मध्येच आंतरराष्ट्रीय उड्डाणे (उदा. दुबई, सिंगापूर) सुरू करण्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.
नवी मुंबई विमानतळ आणि अटल सेतूमुळे रायगड जिल्ह्यात जागतिक स्तरावरील कनेक्टिव्हिटी निर्माण झाल्याने तिसरी मुंबई आकाराला येत आहे. या नव्या शहराला कर्नाळा-साई-चिरनेर असे नाव देण्यात आले असून, ते रायगड जिल्ह्यातील उरण, पनवेल आणि पेण या तीन तालुक्यांमधील 323 चौरस किलोमीटर (124 गावे) परिसरात विस्तारलेले असेल.
अलीकडेच राज्य मंत्रिमंडळाने तिसऱ्या मुंबईच्या भूमी धोरणाला (लँड पोलिसी) मंजुरी दिली आहे. तसेच, एमएमआरडीएने आपल्या 2026-27 च्या अर्थसंकल्पात या शहराच्या उभारणीसाठी तब्बल 4 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
या नव्या शहरामुळे मुंबई आणि नवी मुंबईवरील लोकसंख्येचा ताण कमी होईल. पायाभूत सुविधांचा विकास होऊन जागतिक गुंतवणूक आकर्षित होईल. याशिवाय एमएमआरडीएने पेन ग्रोथ सेंटरसाठी 500 कोटी आणि खारबाव बिझनेस पार्कसाठी 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून हे सर्व मिळून तिसऱ्या मुंबईचा भाग आहे. हे तिसरी मुंबई शहर केवळ निवासी नसेल, तर त्यात एज्यु-सिटी, मेडी-सिटी आणि देशातील 65% क्षमता सामावून घेणारी भव्य डेटा सेंटर्स उभारण्याचे नियोजन आहे. तिसरी मुंबई हा केवळ एक पायाभूत सुविधांचा प्रकल्प नसून, तो संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशाच्या अर्थकारणाची दिशा बदलणारा महाप्रकल्प आहे.
लॉजिस्टिक्स आणि सप्लाय चेनमध्ये मोठी झेप: विमानाद्वारे होणाऱ्या मालवाहतुकीत प्रचंड वाढ होणार आहे. भिवंडी आणि कल्याण हा पट्टा आधीपासूनच गोदामांसाठी प्रसिद्ध आहे. आता आंतरराष्ट्रीय कार्गो हब जवळ आल्यामुळे ई-कॉमर्स कंपन्या, फार्मास्युटिकल कंपन्या आणि मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांचे सर्वात मोठे लॉजिस्टिक हब या भागात विकसित होईल. यामुळे हजारो ब्लू-कॉलर आणि व्हाईट-कॉलर नोकऱ्या निर्माण होतील.
रिअल इस्टेट क्षेत्रातील तेजी: विमानतळ आणि संबंधित उद्योगांमध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी आणि कर्मचाऱ्यांसाठी उच्च दर्जाच्या घरांची मागणी वाढेल. यामुळे ठाणे आणि नवी मुंबईतील रिअल इस्टेट मार्केटमध्ये मोठी गुंतवणूक येईल तिसरी मुंबईमध्ये (उरण, पेण, पनवेल) परवडणाऱ्या घरांचे प्रकल्प येतील, ज्यामुळे मुंबईतील घरांचा ताण कमी होईल.
ठाण्याचा नवीन ग्लोबल कमर्शियल हब म्हणून उदय: मुंबईच्या तुलनेत ठाण्यात जागा अधिक उपलब्ध असल्यामुळे आणि व्यावसायिक दर कमी असल्यामुळे ठाणे शहराला या विमानतळाचा सर्वाधिक फायदा होणार आहे. विमानतळ जवळ आल्यामुळे अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या, आयटी कंपन्या आणि बँकिंग क्षेत्रातील कंपन्या आपली मुख्य कार्यालये किंवा बॅक-ऑफिसेस मुंबईतून ठाणे (विशेषतः वागळे इस्टेट, घोडबंदर रोड, ठाणे-बेलापूर पट्टा) येथे हलवण्याची दाट शक्यता आहे. ठाण्याहून नवी मुंबई विमानतळावर जाणे (ऐरोली-कटाई नाका प्रकल्प किंवा पारसिक बोगद्याच्या माध्यमातून) अत्यंत सोयीचे होणार असल्याने, उद्योजकांसाठी ठाणे हे एक पसंतीचे केंद्र बनत आहे.
मुंबई-ठाण्यावरील ताण कमी होणार: सध्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर क्षमतेपेक्षा जास्त ताण आहे. नव्या विमानतळामुळे मुंबईतील वाहतूक कोंडी, प्रदूषणाची पातळी आणि पायाभूत सुविधांवरील अतिरिक्त भार कमी होईल. यामुळे मुंबई शहराला स्वतःचे इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेड करण्यासाठी आणि अधिक राहण्यायोग्य बनण्यासाठी वेळ आणि वाव मिळेल.
नवी मुंबई विमानतळ हा केवळ विमानांची उड्डाणे वाढवणारा नाही तर तो ठाणे आणि नवी मुंबईला जागतिक नकाशावर एक स्वतंत्र आर्थिक महासत्ता म्हणून प्रस्थापित करणारा प्रकल्प ठरणार आहे. यामुळे येत्या 5 ते दहा वर्षात या भागात अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक आणि लाखो नवीन रोजगार निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तिसऱ्या मुंबईच्या विकासामुळे केवळ रायगडच नव्हे तर संपूर्ण एमएमआर क्षेत्राला एक नवी आर्थिक दिशा मिळत आहे. जागतिक स्तरावरील उद्योग आणि परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी हे एक प्रमुख केंद्र बनत आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली सारख्या शहरांवरील ताण कमी होईल.
रोजगार क्षेत्रात मोठी क्रांती अपेक्षित
विमानतळ पूर्ण क्षमतेने सुरू झाल्याने रोजगार क्षेत्रात मोठी क्रांती अपेक्षित आहे. विमानतळ ऑपरेशन्स, एअरलाईन्स, ग्राउंड हँडलिंग, सुरक्षा, कस्टम्स आणि एव्हिएशन इंजिनिअरिंग या क्षेत्रांत हजारो थेट नोकऱ्या निर्माण होत आहेत. तसेच विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांमुळे कॅब सेवा, सार्वजनिक वाहतूक, स्थानिक व्यवसाय आणि फॅसिलिटी मॅनेजमेंट यांसारख्या क्षेत्रांमध्ये लाखो रोजगार निर्माण होतील.
हॉस्पिटॅलिटी आणि पर्यटन क्षेत्राला चालना
परदेशी आणि देशांतर्गत प्रवाशांची संख्या वाढल्यामुळे ठाणे आणि नवी मुंबई परिसरात पंचतारांकित हॉटेल्स, बजेट हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सची साखळी वेगाने विस्तारत आहे. तिसरी मुंबई आणि कोकणाकडे जाणारा मार्ग सुकर झाल्यामुळे स्थानिक पर्यटनाला मोठी चालना मिळेल, ज्यातून गाईड्स, ट्रॅव्हल एजन्सीज आणि स्थानिक कलाकुसरीच्या व्यवसायांना थेट आर्थिक फायदा होईल.