

माद्रिद : जगातील असे एक विमानतळ जे सर्वात मोठे, अत्यंत अद्ययावत व ज्याची तब्बल 1 कोटी प्रवाशांची क्षमता होती. ते सुरू होताच अवघ्या तीन वर्षांतच बंद पडले! हे विमानतळ युरोपमध्ये आहे. त्याचे नाव रियल सिउदाद एयरपोर्ट. त्या विमानतळाची ओळख आता ‘शापित विमानतळ’ अशी झाली आहे.
2009 मध्ये जेव्हा हे विमानतळ बनले तेव्हा ते खरोखरच भव्य होते. त्याचा एकूण खर्च जवळपास 11,383 कोटी रुपये होता. परंतु, युरोपमधील सर्वात लांब 4.1 कि.मी. धावपट्टी आणि दरवर्षी 1 कोटी प्रवाशांना हाताळण्याची क्षमता असूनही, हा प्रकल्प अयशस्वी झाला. असं का झालं असेल, असा प्रश्न तुम्हाला देखील नक्की पडला असेल. प्रकल्प अयशस्वी होण्याचं नेमकं कारण काय असेल? हे अत्याधुनिक विमानतळ स्पेनची राजधानी माद्रिदपासून सुमारे 200 किलोमीटर अंतरावर बांधण्यात आलं होतं आणि यामुळेच प्रकल्प अयशस्वी ठरला. रिपोर्टनुसार, तेथील सरकारने वचन दिलं होतं की, माद्रिद येथून विमानतळापर्यंत एक हाय स्पीड ट्रेन चालवण्यात येईल.
यामुळे लोकांना विमानतळावर पोहोचायला एक तास लागेल; पण स्टेशन कधी तयार झालेच नाही. परिणामी, प्रवाशांची संख्या इतकी कमी झाली की विमान कंपन्यांनी देखील माघार घेतली. 2011 मध्ये, शेवटच्या विमान कंपनीने कामकाज बंद केले आणि विमानतळ बंद पडले. अब्जावधी रुपयांचा या प्रोजेक्टवर तीन वर्षांत 3100 कोटींपेक्षा अधिक कर्जबाजारी झाला. जेव्हा ते विकण्याची वेळ आली तेव्हा कोणीही रस दाखवला नाही. नंतर, एका चिनी कंपनीने 11 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पासाठी फक्त 10 लाख रुपयांची बोली केली. रिपोर्टनुसार, दीर्घ कायदेशीर लढाईनंतर, हे विमानतळ 2018 मध्ये त्याच्या किमतीपेक्षा खूपच कमी म्हणजे सुमारे 580 कोटी रुपयांना विकण्यात आलं. पण, ते प्रवाशांसाठी नाही तर तुटलेली विमाने दुरुस्त करून त्यांना भंगारात रूपांतरित करण्यासाठी!