

नवी मुंबई : राजेंद्र पाटील
महापालिका निवडणुकीनंतर नवी मुंबईत समाविष्ट केलेली चौदा गावे सहा महिन्यांत वगळण्यात येतील, असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचे मंत्री गणेश नाईक यांनी एका कार्यक्रमात सांगितले. मात्र असे असले तरी सह्याद्रीवर झालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीनंतर भाजपच्या बेलापूर मतदारसंघाच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी नाईकांना थेट विरोध करत चौदा गावांचा समावेश नवी मुंबई महापालिकेत झाला पाहिजे. तेही स्थानिक प्रकल्पग्रस्त आहेत. माझ्या मतदारसंघात ही गावे आहेत. अन्यथा राज्य सरकारने दत्तक घ्यावीत, अशी स्पष्ट भूमिका घेतली. यामुळे भाजपमध्येच वादाची ठिणगी पडली.
नवी मुंबई महापालिकेत कल्याण-डोंबिवलीतील 14 गावे समाविष्ट करण्याचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. या गावांसाठी नवी मुंबई महापालिकेने एक उपआयुक्तही नियुक्त केले. मात्र तरीही भाजपचे नवी मुंबईतील नेते आणि वनमंत्री गणेश नाईक यांनी तीव्र विरोध करत गावे वगळण्यात यावी अशी मागणी केली होती. मात्र शुक्रवारी सह्याद्रीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या बैठकीत पुन्हा चौदा गावांचा मुद्दा झाला. निवडणुकीनंतर ही गावे सहा महिन्यांत वगळण्यात येतील, असा शब्द मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्याचे नाईक यांनी म्हटले. पण ही गावे प्रकल्पग्रस्तांची आहेत. त्यांच्याही जमीनी गेल्या आहेत. त्यामुळे ही गावे नवी मुंबई महापालिकेत घेण्यासाठी काहीच हरकत नाही. घेतलीच पाहिजेत, अशी स्पष्ट भूमिका भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी घेतली.
यामुळे आमदार म्हात्रेंनी केलेला विरोध चर्चेचा विषय ठरला आहे. भाजपच्या या दोन आमदारांचे वैर विधानसभा निवडणुकीत समोर आले होते. त्यामुळे नाईकांची भूमिका हे त्यांच्या पदाधिकारी आणि त्यांच्यापुरतेच मर्यादित आहे. ते कुणावर ही लादू शकत नाही, अशी भूमिका आमदार म्हात्रे यांचे समर्थक घेताना दिसून येते.
मुख्यमंत्र्यांचा सबुरीचा सल्ला
नाईक शिंदेंविरोधात बोलण्याची एकही संधी सोडत नाही. मात्र आज सह्याद्रीवर झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका निवडणुकीनंतर समाविष्ट केलेले चौदा गावे वगळण्यात येतील, असा सबुरीचा सल्ला आपल्याच पक्षाचे मंत्री गणेश नाईक यांना दिला. तर दुसरीकडे भाजपचे नवी मुंबईतील बेलापूर मतदारसंघाचे आमदार मंदा म्हात्रे यांनी चौदा गावे नवी मुंबईत समाविष्ट करण्यावर स्पष्ट भूमिका घेत नाईक यांच्या भूमिकेला विरोध केला. यामुळे भाजपमध्येच वादाला तोंड फुटले आहे.