

मुंबई ः राज्य कला संचालनालयाच्या अंतर्गत असलेल्या जेजेमधील वास्तूकला आणि फाईन आणि कमर्शियल आर्टच्या महाविद्यालयांना वेगळे स्थापन झालेल्या सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट, आर्किटेक्चर अँड डिझाईन (अभिमत स्तरावरील डी-नोव्हो विद्यापीठ)या विद्यापीठाला अखेर पहिले पूर्णवेळ कुलगुरू मिळाले आहेत. हिमाचल प्रदेश विद्यापीठाच्या दृश्यकला विभागाचे प्राध्यापक असलेले प्रा. हिम चटर्जी यांची निवड करण्यात आली आहे.
जे. जे. विद्यापीठाला 19 ऑक्टोबर 2023 रोजी ‘डी-नोवो डीम्ड-टू-बी युनिव्हर्सिटी’चा दर्जा मिळाला होता. त्यानंतर मार्च 2024 पासून होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रजनीश कामत यांच्याकडे प्रभारी कुलगुरूपदाची जबाबदारी होती. डॉ. कामत यांनी एक वर्ष 6 महिन्यांहून अधिक काळ कार्यभार सांभाळून विद्यापीठातील यूजीसीने मान्यता दिलेले नवीन अभ्यासक्रम आदी सुरू केले.
डी-नोव्हो विद्यापीठाच्या नियमावलीनुसार या विद्यापीठाच्या कुलगुरूंची नियुक्ती ही राज्यपालांऐवजी उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून करण्याची तरतूद आहे. विभागाने कायमस्वरूपी कुलगुरू निवडण्यासाठी राजस्थान येथील महाराजा गंगा सिंह विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. मनोज दीक्षित यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती स्थापन केली होती. या समितीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. नितीन करमळकर आणि मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांचा समावेश होता. समितीने अंतिम उमेदवारांची मुलाखत घेऊन तीन नावांची शासनाकडे शिफारस केली. त्यानंतर प्रा. चटर्जी यांच्या नियुक्तीचा आदेश काढण्यात आला आहे.
प्रा. हिम चटर्जी हे शिमला येथील हिमाचल प्रदेश विद्यापीठातील दृश्य कला विभागाचे प्राध्यापक व अध्यक्ष आहेत. भित्तिचित्रे, चित्रकला, रेखाटने आणि स्केचेस या क्षेत्रात त्यांनी आपली स्वतंत्र छाप पाडली आहे. शिमलाजवळील ह्यून गावात त्यांनी पहिले व्यावसायिक समकालीन आर्ट गॅलरी-कम-रेसिडेन्सी उभारली. देशभरात 100 हून अधिक भित्तिचित्रे व कलाकृतींची निर्मिती व स्थापना करून त्यांनी दृश्यकलेच्या क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना हिमाचल प्रदेश शिखर सन्मान (2017), नॅशनल स्वस्ति सन्मान (2018), आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, नवी दिल्ली (2014) आदी पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.