

मुंबई : तीनही मेट्रो मार्गिकांवर शुक्रवारी एकाच दिवशी तांत्रिक बिघाड झाल्याने वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. वेळापत्रक बिघडल्याने स्थानकांवर मोठी गर्दी झाली होती.
आचार्य अत्रे चौक स्थानकाच्या दिशेला जाणार्या भुयारी मेट्रो दुपारी 2.44 च्या सुमारास सांताक्रूझ स्थानकात बिघाड झाला. अचानक ठिणग्या उडाल्या व धूर येऊ लागला. त्यामुळे सुरक्षेच्याकारणास्तव गाडी स्थानकातच थांबवून प्रवाशांना खाली उतरवण्यात आले. अंधेरी-दहिसर-गुंदवली या मेट्रो 2अ व मेट्रो 7 या मार्गिकांवर संध्याकाळी ऐन गर्दीच्या वेळेस तांत्रिक बिघाड झाला. यामुळे एक तास सेवा खंडित झाली.
दिंडोशी मेट्रो स्थानकावर उभ्या असलेल्या गाडीत वीजपुरवठ्याची समस्या निर्माण झाल्याने ही गाडी रद्द करून ती परत कारशेडला न्यावी लागली. त्यामुळे या मार्गिकांवरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. गुंदवली मेट्रो स्थानकाकडे जाणारे प्रवेशद्वार रात्री पावणे आठ वाजेपर्यंत बंद होते. गुंदवली स्थानकात गर्दी झाल्याने ही खबरदारी घेण्यात आली. मात्र, यामुळे स्थानकाबाहेर प्रवाशांची गर्दी झाली होती. संध्याकाळी 7 च्या सुमारास जोगेश्वरी पूर्व, मिठ चौकी आणि बांगूरनगर मेट्रो स्थानकांत मेट्रोगाड्या 15-20 मिनिटे थांबल्या होत्या. यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.