Nana Patekar memories : “दोन नाना... अन्‌ एक अविस्मरणीय फोन कॉल!”

कर्नल गिरिधर धोंडिराम कोले, सेना मेडल (सेवानिवृत्त), यांनी नाना पाटेकर यांच्याशी फोनवर झालेल्या एका छोट्या संवादाची भावनिक आठवण जागवली आहे.
Nana Patekar
Nana PatekarFile Photo
Published on: 
Updated on: 

कर्नल गिरिधर धोंडिराम कोले, सेना मेडल (सेवानिवृत्त).

काही माणसं आपल्या आयुष्यात फार काळ नसतात… पण त्यांच्यासोबत घडलेला एखादा छोटासा प्रसंग मात्र आयुष्यभर मनात घर करून राहतो. आज नाना पाटेकर आपल्यात नाहीत, म्हणून त्यांच्याशी झालेला माझा हा छोटासा फोनवरील संवाद पुन्हा एकदा आठवला… मन भरून आलं आणि त्याच वेळी चेहऱ्यावर हसूही आलं.

नानांशी माझी ही भेट कुठल्या मोठ्या मंचावर झाली नव्हती, ना एखाद्या चित्रपटाच्या सेटवर…ती झाली होती एका साध्या फोन कॉलवर. आणि त्या फोन कॉलमध्ये “नाना” या एकाच शब्दामुळे माझा जो गोंधळ झाला, तो आजही विसरता येत नाही!

एकदा मला एका कार्यक्रमासाठी नाना पाटेकर यांना लातूरला बोलवायचं होतं. माझ्या एका जवळच्या मित्राने मला नाना पाटेकरांचा मोबाईल नंबर दिला. साधारण सकाळी साडेनऊच्या सुमारास मी त्यांना फोन केला. त्यांनी फोन उचलला नाही. म्हणून मी मेसेज केला.

Nana Patekar
Stone Pelting On Car: देशात चाललंय तरी काय... मुलीला गाडीतून शाळेत सोडायला चाललेल्या आईवर सरपंचाच्या मुलांनी केली दगडफेक

“नाना, मी कर्नल गिरिधर कोले (रिटायर्ड). मला कृपया कॉल बॅक करा, काहीतरी बोलायचं आहे.”फोन केल्यानंतर मी नाना पाटेकरांचा नंबर मोबाईलमध्ये “नाना पाटेकर” या नावाने सेव्ह केला.

पण इथेच खरी गंमत होती!आमच्या घरात माझ्या सासऱ्यांना माझ्या मुली “नाना” म्हणतात. त्यामुळे मीसुद्धा त्यांना प्रेमाने “नाना” याच नावाने हाक मारतो. आणि माझ्या मोबाईलमध्ये त्यांच्या नंबरचं नावही फक्त “नाना” असंच सेव्ह केलेलं होतं.

म्हणजे माझ्या मोबाईलमध्ये एक “नाना” माझे सासरे होते आणि दुसरे “नाना” म्हणजे नाना पाटेकर! थोड्या वेळाने माझ्या मोबाईलवर नाना पाटेकर सरांचा कॉल आला. कॉल उचलताना मी स्क्रीनवर फक्त “नाना…” एवढंच पाहिलं. पूर्ण नाव वाचलंच नाही. शिवाय, काही वेळापूर्वी मीच नाना पाटेकरांना फोन केला होता आणि मेसेजही केला होता, हेही त्या क्षणी माझ्या लक्षात राहिलं नाही.

मी बँकेत बसलो होतो आणि मला वाटलं माझ्या सासऱ्यांचाच “नाना” फोन करत आहेत! मी फोन उचलला आणि अगदी घरच्यांसारखं म्हणालो

“बोला ना नाना…”

समोरून आवाज आला

“तुम्ही कॉल केला होता…”

मी पुन्हा म्हणालो

“नाही नाना, बोला ना…”

दोन-तीन वेळा असंच झाल्यावर समोरून आवाज आला

“अहो… मी नाना पाटेकर बोलतोय!”

अरे बापरे! त्या क्षणी मला लक्षात आलं हा माझ्या घरचा “नाना” नाही, तर नाना पाटेकर आहेत!

क्षणभर माझी बोलतीच बंद झाली. मी लगेच म्हणालो, “अरे बापरे! नाना, माफ करा! आमच्या घरात माझ्या सासऱ्यांनासुद्धा सगळे ‘नाना’ म्हणतात. त्यामुळे त्यांचा नंबरही ‘नाना’ म्हणून सेव्ह आहे. तुमचा नंबर मी ‘नाना पाटेकर’ या नावाने सेव्ह केला होता; पण स्क्रीनवर फक्त ‘नाना’ वाचलं आणि माझा गोंधळ झाला. Sorry!”

नाना हसले आणि अगदी सहज म्हणाले

“हो, काय हरकत नाही, कर्नलसाहेब!”

त्यांचा तो सहजपणा आजही आठवतो.

त्यानंतर आमचं व्यवस्थित बोलणं झालं.

मी त्यांना सांगितलं की, आम्हाला त्यांना एका कार्यक्रमासाठी लातूरला बोलवायचं आहे.

Nana Patekar
Raj Thackeray: MPSC विद्यार्थ्यांच्या नोकऱ्यांचा प्रश्न सुटणार? राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांशी केली चर्चा; म्हणाले, नोकरीसाठी...

नाना म्हणाले, “मी नक्की येऊ शकतो; पण सध्या माझं शेड्यूल खूप बिझी आहे. शूटिंग सुरू आहे. परत आल्यानंतर वेळ काढतो आणि तुम्हाला फोन करतो. आपण लातूरला येण्याचा एक प्लॅन नक्की करूया.”

बस्स… हीच ती छोटीशी भेट फोनवरची!

आज नाना आपल्यातून गेले, म्हणून ही आठवण पुन्हा मनात आली.

कधी कधी आयुष्यातील मोठ्या व्यक्तींशी झालेल्या भेटी मोठ्या कार्यक्रमांत किंवा मंचावर होत नाहीत…

त्या एखाद्या साध्याशा फोन कॉलमध्ये घडतात आणि आयुष्यभराची आठवण बनून राहतात!

माझ्यासाठी नाना पाटेकरांशी झालेला हा पहिला संवाद कायम लक्षात राहील.

आणि माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवर त्या दिवशी दिसलेला तो एकच शब्द

“नाना…”

पण त्या एका शब्दामागे दोन नाना होते… एक माझ्या घरचा नाना… आणि दुसरे संपूर्ण महाराष्ट्राच्या मनातले नाना!

आजही हे आठवलं की हसू येतं… आणि मनात एकच भावना येते. काही माणसं आपल्यातून निघून जातात, पण त्यांच्या आठवणी मात्र कधीच जात नाहीत.

नाना, तुम्ही कायम आठवणीत राहाल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news