

मुंबई: ओसी मिळून दोन महिने उलटले असताना बीडीडीवासीय घराच्या ताबापासून वंचित आहेत. दिवाळीपूर्वी चाव्या न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशारा रहिवाशांनी दिला आहे.मंत्र्यांना वेळ नाही म्हणून सर्वसामान्य नागरिकांनी आपल्या हक्काच्या घरासाठी किती दिवस प्रतीक्षा करायची, असा सवाल नामजोशी मार्ग येथील बीडीडी चाळवासीयांनी केला आहे.
दोन महिन्यांपूर्वी भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) मिळूनही तीन इमारतींमधील रहिवाशांना अद्याप घरांचा ताबा देण्यात आलेला नाही. सरकार आणि म्हाडाच्या या दिरंगाईमुळे रहिवाशांची दिवाळी भाड्याच्या घरात साजरी होणार असल्याचे चित्र आहे.
नामजोशी मार्ग येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचे काम वरळी आणि नायगावच्या तुलनेत सर्वप्रथम सुरू झाले होते. मात्र, आज त्याच प्रकल्पातील रहिवाशांना घरांच्या चाव्यांसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.
वरळी आणि नायगाव येथील रहिवाशांना नव्या घरांचा ताबा मिळाला असताना नामजोशी मार्गचा प्रकल्प मात्र विविध कारणांमुळे मागे पडला आहे. पहिल्या टप्प्यातील सात इमारतींपैकी ई, एफ आणि जी या तीन इमारतींना दोन महिन्यांपूर्वीच ओसी मिळाली आहे. तरीही ५०० हून अधिक रहिवाशांना घरात प्रवेश करण्यासाठी प्रतीक्षाच करावी लागत आहे.
गणेशोत्सवापूर्वी घरांच्या चाव्यांचे वितरण केले जाईल, असे म्हाडा आणि शासनाकडून सांगण्यात आले होते. मात्र, तो मुहूर्त टळला. त्यानंतर नवरात्रोत्सवात कोणत्याही परिस्थितीत घरांचा ताबा देण्याचे आश्वासन लोकप्रतिनिधी आणि म्हाडाकडून देण्यात आले. मात्र, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या वेळेचे गणित जुळले नाही आणि रहिवाशांच्या पदरी पुन्हा निराशाच पडली.
गेल्या आठवड्यातही सरकारकडून घरांचा ताबा देण्याची ग्वाही देण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात अद्याप कोणतीही हालचाल झालेली नाही. आता दिवाळी अवघ्या आठवड्यावर आली असतानाही चावी वितरणाची तारीख निश्चित झालेली नाही.
ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते चाव्या द्या!
नामजोशी मार्ग बीडीडी चाळ पुनर्विकास समितीचे सरचिटणीस तानाजी केसरकर यांनी सरकारच्या भूमिकेवर तीव्र संताप व्यक्त केला. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना वेळ मिळत नसेल तर ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते चाव्यांचे वितरण करा. केवळ मंत्र्यांची वेळ मिळत नाही म्हणून नागरिकांना त्यांच्या हक्काच्या घरांपासून वंचित ठेवणे योग्य नाही. आम्ही आता श्वासही मंत्र्यांच्या वेळेनुसार घ्यायचा का, असा संतप्त सवाल केसरकर यांनी केला.