

मुंबई : नायगाव बीडीडी चाळीतील 864 घरांना निवासी दाखला प्राप्त झाला असून बुधवारी रहिवाशांना घरांचा ताबा देण्यात येणार होता. मात्र अचानक हा कार्यक्रम रद्द झाल्याने नायगाव बीडीडीवासीयांचे गृहस्वप्न लांबणीवर पडले आहे.
वरळी बीडीडी चाळीतील 556 रहिवाशांना नव्या घरांचा ताबा नुकताच देण्यात आला. त्यानंतर पुढील लक्ष्य नायगाव बीडीडीचे होते. डिसेंबरमध्ये नायगाव बीडीडीतील 864 रहिवाशांना घरांचा ताबा दिला जाईल, असे सांगण्यात आले होते. बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हा कार्यक्रम होणार होता. मात्र सोमवारी रात्री अचानक हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याने रहिवाशांची निराशा झाली.
बीडीडी प्रकल्पांतर्गत मुंबईतील वरळी, ना.म. जोशी मार्ग-परळ, नायगाव येथील सुमारे 86 एकरवर वसलेल्या सुमारे 207 चाळींचा पुनर्विकास केला जात आहे. यात 15 हजार 593 रहिवाशांचे पुनर्वसन केले जात आहे. ना. म. जोशी मार्ग-परळ प्रकल्पामध्ये 2 हजार 560 निवासी व अनिवासी गाळे असून 14 पुनर्वसन इमारती बांधल्या जात आहेत. नायगाव (दादर) येथे 3 हजार 344 निवासी व अनिवासी गाळ्यांसह 20 पुनर्वसन इमारती उभारण्याचे काम सुरू आहे.