

मुंबई : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही मशाल आणि तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह कायम ठेवले आहेत. विशेष म्हणजे गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये अपक्षांना बहाल करण्यात आलेले पिपाणी हे चिन्ह आयोगाने हटवले आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील पात्र 435 राजकीय पक्षांची अधिकृत यादी मंगळवारी जाहीर केली आहे. राजपत्रातील यादीत 5 राष्ट्रीय पक्ष, 5 राज्यस्तरीय पक्ष आणि इतर राज्यातील 9 राज्यस्तरीय पक्षांचा समावेश आहे. तसेच, निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत असलेल्या 416 राजकीय मान्यताप्राप्त असलेल्या पक्षांच्या चिन्हांसहित यादी प्रसिद्ध केली आहे.
या यादीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाचे ‘मशाल’ चिन्ह, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे ‘धनुष्यबाण’ चिन्ह, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार यांच्या पक्षाचे ‘घड्याळ’ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) ‘तुतारी वाजवणारा माणूस’ या चारही चिन्हांना नावांसहित वेगळे स्थान देण्यात आले आहे.
विशेष म्हणजे आयोगाने दोन्ही राजकीय पक्षांच्या चिन्ह आणि नावावरील वादाचा अंतिम निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर अवलंबून असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांचा राजकीय संघर्षाचा गोंधळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही दिसून येणार आहे.
शशिकांत शिंदेंना बसला होता पिपाणीचा फटका
पिपाणी चिन्ह गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची डोकेदुखी ठरले होते. हे चिन्ह घेवून निवडणूक लढवत असलेल्या अपक्ष उमेदवारांनी बऱ्यापैकी मते घेतली होती. विशेषतः सातारा लोकसभा मतदारसंघातील शरद पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांना त्याचा फटका बसून ते पराभूत झाले होते. या मतदार संघात भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले 32 हजार 274 मतांनी विजयी झाले होते. तर पिपाणीवर उभे असलेले संजय गाडे यांनी 37 हजार 35 मते घेतली होती.