

मुंबई: विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या पाच जागांसाठी निवडणूक होत असून या निवडणुकीत जागावाटपावरून महाविकास आघाडीत मतभेद निर्माण झाले आहेत. त्यातच काँग्रेसने परस्पर नागपूर पदवीधर आणि पुणे व अमरावती शिक्षक या तीन मतदारसंघांसाठी परस्पर उमेदवार दिल्याने उबाठा शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात नाराजी निर्माण झाली आहे.
विधान परिषदेच्या नागपूर, पुणे, संभाजीनगर या तीन पदवीधर, तर पुणे व अमरावती शिक्षक अशा पाच विधान परिषद मतदारसंघांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. काँग्रेसने आघाडीतील दोन पक्षांच्या नेत्यांना विश्वासात न घेता परस्पर तीन जागा जाहीर केल्या आहेत.
नागपूर पदवीधर मतदारसंघातून विद्यमान आमदार अभिजित वंजारी, पुणे शिक्षक मतदारसंघातून आमदार जयंत आसगावकर आणि अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या पाच जागांसाठी अदिती पोहरे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यावरून महाविकास आघाडीत मतभेद उफाळून आले आहेत.
काँग्रेसने उमेदवार जाहीर
करताना आम्हाला विश्वासात घेतले नाही, असा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
एकमत झालं नाही, तर मैत्रीपूर्ण लढत
छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघाच्या जागेवर शरद पवार गट आणि ठाकरे गट या दोघांनी दावा केला आहे. काहीही झाले तरी आम्ही अमरावती शिक्षक आणि छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढणार, असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.
आम्हालाही पक्ष चालवायचा आहे. एकमत झालं नाही, तर मैत्रीपूर्ण लढत होईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. मात्र काँग्रेस आधी जाहीर केलेल्या तीन जागा लढण्यावर ठाम आहे.