MHT CET Admission: MHT-CETचे प्रवेश गणित बदलणार? बारावीच्या गुणांना वेटेज; ६०-५५%चा पर्याय चर्चेत

अभियांत्रिकी, फार्मसी प्रवेशासाठी बारावीचे गुण आणि सीईटी पर्सेंटाइलचा एकत्रित विचार करण्याचा प्रस्ताव; अद्याप अंतिम निर्णय नाही
Admission
AdmissionPudhari
Published on: 
Updated on: 

पवन होन्याळकर

मुंबई: अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्राच्या प्रवेश प्रक्रियेत बारावीच्या गुणांना अधिक महत्त्व देण्याच्या हालचाली सुरू आहेत. खुल्या प्रवर्गासाठी ६०, तर राखीव प्रवर्गासाठी ५५ टक्के गुणांची किमान अट ठेवण्याच्या पर्यायाची चाचपणी सुरू असल्याचे समजते.

त्याचबरोबर बारावीतील गुण आणि एमएचटी-सीईटीतील पर्सेंटाइल यांचा एकत्रित विचार करून गुणवत्ता यादी निश्चित करण्याचे सूत्रही असेल याबाबतही विचार केला जात आहे.

राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सध्या एमएचटी-सीईटीच्या पर्सेंटाइलला प्रमुख महत्त्व आहे. बारावीतील गुणांची भूमिका प्रामुख्याने प्रवेशासाठीची पात्रता पूर्ण करण्यापुरतीच मर्यादित आहे. या पद्धतीत बदल करून विद्यार्थ्यांची बारावीची टक्केवारी आणि एमएचटी-सीईटीतील गुणांनाही वेटेज दिले जाणार आहे.

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या आयुक्तांनी २ सप्टेंबर रोजी अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्राच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी गुणवत्ता निश्चितीची पद्धत बदलण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव सादर केला आहे.

Admission
Mumbai HIV Patients: मुंबईतील एचआयव्ही उपचारांबाबत मोठी आकडेवारी समोर; ७.५ टक्के रुग्ण नियमित पाठपुराव्याबाहेर

त्यानंतर या विषयाचा अभ्यास करून शिफारसी शासनाला करण्यासाठी तज्ज्ञ समिती नियुक्त करण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू, सीओईपी तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू, उच्च शिक्षण संचालक आणि तंत्रशिक्षण संचालक यांचा समितीत समावेश आहे. समितीच्या यासंदर्भात बैठकाही झाल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

बारावीच्या परीक्षेतील गुण आणि एमएचटी-सीईटी पर्सेंटाइल यांना गुणवत्ता यादीत किती प्रमाणात स्थान द्यायचे, पीसीबी आणि पीसीएम या गटातील विषयांना महत्व, दोन्ही परीक्षांच्या निकालांमध्ये समतोल साधता यावा, गुणवत्ता निश्चितीची पद्धत पारदर्शक आणि वस्तुनिष्ठ राहावी, तसेच सर्व उमेदवारांना समान संधी मिळावी, अशा विविध मुद्यांवर समिती सदस्यांनी चर्चा केलीआहे.

Admission
ST Parcel Service: राज्यात एसटीच्या पार्सल सेवेला ब्रेक; दोन महिन्यांनंतरही नवीन ठेकेदार नियुक्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

बारावीचे गुण आणि सीईटीतील पर्सेंटाइल यांचे प्रमाण निश्चित करून गुणवत्ता यादी तयार करण्याची शिफारस झाल्यास त्याची अंमलबजावणी कोणत्या प्रवेश वर्षापासून करता येईल, याबाबतही समिती शिफारस करणार आहे. याबरोबरच बारावीच्या परीक्षेत खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी किमान ६० टक्के आणि राखीव प्रवर्गासाठी ५५ टक्के गुणांचा निकष ठेवण्याच्या पर्याय समोर आला आहे.

सध्या अभियांत्रिकी प्रवेशासाठी पीसीएम गटात सर्वसाधारण प्रवर्गासाठी किमान ४५ टक्के, तर राखीव प्रवर्गासाठी ४० टक्के गुणांची पात्रता आहे. औषधनिर्माणशास्त्रासाठी सर्वसाधारण प्रवर्गासाठी ५० टक्के, तर राखीव प्रवर्गासाठी ४५ टक्के गुणांची अट आहे. ही पात्रता पूर्ण केल्यानंतर गुणवत्ता निश्चितीत एमएचटी-सीईटी पर्सेंटाइल गुणावर विद्यार्थ्यांला प्रवेश मिळतो.

जेईईच्या माध्यमातून बारावीच्या गुणांची स्वतंत्र पात्रता पूर्ण करावी लागते. खुल्या प्रवर्गासह किमान ७५ टक्के, तर एससी, एसटी आणि पीडब्ल्यूडी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना किमान ६५ टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. यानुसार आता एमएचटी सीईटीसाठीही पात्रता पूर्ण करावी लागणार आहे.

अंतिम स्वरूप देण्यासाठी होणार बैठक

बारावीच्या परीक्षेतील गुणांपेक्षा सीईटीतील पर्सेंटाइल वाढविण्यावर विद्यार्थ्यांचा भर राहतो. बारावीच्या गुणांना गुणवत्ता यादीत स्वतंत्र महत्त्व देण्याचा निर्णय झाल्यास प्रवेशाचे गणित बदलण्याची शक्यता आहे. बारावी आणि सीईटी या दोन्ही परीक्षांची तयारी करण्यासाठी विद्यार्थ्यांना पुरेसा अवधी मिळावा, याचा विचार करून बदल कोणत्या प्रवेश वर्षापासून लागू करावा, याची शिफारस समिती करणार आहे. ५५-६० टक्क्यांचा निकष हा सध्या समितीत प्रामुख्याने चर्चेतील पर्याय असून त्याला अद्याप अंतिम स्वरूप देण्यासाठी एक बैठक होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news