

मुंबई : चंदन शिरवळे
महानगरपालिका निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निहाय 9 ते 15 लाख रुपये घातलेली खर्च मर्यादा उमेदवारांकडून ओलांडली जाणार आहे. आयोग म्हणतंय 150 रुपयांतच कार्यकर्त्यांना जेवू घाला, हे शक्य नसल्याने उमेदवार टेन्शनमध्ये आले आहेत. याशिवाय प्रचार साहित्य महाग झाल्यामुळे खर्चावर मर्यादा घालणे कोणालाही शक्य नाही. आयोगाने घातलेली मर्यादा फुसकी ठरणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
राज्यात मुंबईसह 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. या माध्यमातून 2 हजार 869 उमेदवार निवडून येणार आहेत. मात्र, निवडून येणाऱ्यांपेक्षा रिंगणात उतरणाऱ्यांची संख्या मोठी असेल. हा आकडा उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी म्हणजे 3 जानेवारी रोजी स्पष्ट होईल. निवडणूक आयोगाने बृहन्मुंबई आणि ‘अ’ वर्गातील पुणे व नागपूर महानगरपालिका क्षेत्रात उमेदवारांना 15 लाख रुपये खर्च मर्यादा घातली आहे.
‘ब’ वर्गातील पिंपरी-चिंचवड, नाशिक व ठाणे महापालिकेत 13 लाख तर ‘क’ वर्गातील कल्याण-डोंबिवली, नवी मुबई, छत्रपती संभाजीनगर, वसई-विरारसाठी 11 लाख आणि ‘ड’ वर्गातील महानगरपालिका क्षेत्रात 9 लाख रुपये खर्च मर्यादा घातली आहे. वास्तविक, प्रत्येक शहरात महागाई आहे. यामधून ग्रामीण भागसुद्धा सुटत नाही. तरीही ‘अ’, ‘ब’, ‘क’ आणि ‘ड’ वर्ग महानगरपालिका असा आयोगाने केलेला भेदाभेद राजकीय पक्ष आणि जनतेला पटला नसल्याची चर्चा आहे. उमेदवारी अर्ज ते प्रत्यक्ष मतदान असे पंधरा दिवस उमेदवारांना खर्च करावा लागणार आहे. त्यासाठी प्रचार साहित्याची जमवाजमव आवश्यक आहे.
निवडणूक चिन्ह असलेल्या टोप्या, गमजे, झेंडे, सदरे, साड्या इत्यादी कापडी साहित्यासह इतर साहित्य खरेदी करावी लागणार आहे. याशिवाय दरदिवशी लागणारा स्टेज, लाऊडस्पीकर आणि प्रचार यात्रेत सहभागी होणाऱ्यांवर खर्च करावा लागणार आहे. हा खर्च आयोगाला म्हणजे संबंधित महानगरपालिका आयुक्तांकडे सादर केला जाणार आहे. जाहीर केलेल्या मर्यादेहून कितीतरी अधिक खर्च होणार आहे. त्यामुळे आयोगाने निवडणूक खर्चावर घातलेली मर्यादा दिखाऊ असल्याचे स्पष्ट होते.
असे आहेत आयोगाचे दर
चहा 10 रुपये, कॉफी 12 रुपये, पाण्याची बाटली 20 रुपये, बिस्कीट 5 रुपये, वडापाव 12 रुपये, भाजी 15 रुपये, पोहे 20 रुपये, डोसा 40 रुपये, पावभाजी, मिसळपाव 65 रुपये, शाकाहारी जेवण 150 रुपये, तर मांसाहारी जेवण 250 रुपये दर निश्चित करण्यात आला आहे.