

मुंबई : साहित्य संमेलनाच्या व्यासपिठावरून आपले साहित्य वाचकांपर्यंत पोचावे, अशी प्रत्येक लेखकाची इच्छा असते. पुढील महिन्यात सातारा येथे होणाऱ्या 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात राज्यभरातील लेखकांची तब्बल 110 पुस्तके प्रकाशित होणार आहेत. पाच सत्रात होणाऱ्या प्रकाशन कट्ट्याचे उद्घाटन संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांच्या हस्ते होईल, अशी माहिती प्रकाशन कट्ट्याचे मुख्य समन्वयक घनश्याम पाटील यांनी दिली.
पुस्तक प्रकाशनाचा खर्च सर्वसामान्यांना परवडणारा नसतो. त्यामुळे विशेषतः ग्रामीण भागातील लेखकांचे साहित्य यामुळे अप्रकाशित राहाते. हीच बाब लक्षात घेत संमेलनाच्या व्यासपिठावरून लेखकांच्या साहित्याला प्रकाशझोतात आणण्याची संधी मिळाली आहे. विशेष म्हणजे, त्यासाठी लेखकांकडून कोणतेही प्रकाशन शुल्क न आकारण्याचा निर्णय संमेलनाच्या आयोजकांनी घेतला आहे. याचा लाभ घेत लेखकांनी पुस्तक प्रकाशन कट्ट्यासाठी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे.
1 जानेवारी रोजी सायंकाळी पहिल्या सत्रात संस्कृती प्रकाशनने केलेले जनसंवाद राजमातांचा हे राजमाता श्रीमंत छत्रपती सुमित्राराजे भोसले यांच्या ऐतिहासिक सामाजिक, सांस्कृतिक आणि अध्यात्मिक भाषणाचा आढावा घेणारे पुस्तक आणि देशमुख अँड कंपनीने केलेले नरहर कुरुंदकर यांचे युगप्रवर्तक छत्रपती ही पुस्तके प्रकाशित होत आहेत. राज्यातील विविध प्रकाशकांची उपस्थिती या संमेलनानिमित्ताने राहणार आहे. त्यामुळे नवोदित लेखक आणि प्रकाशकांची प्रत्यक्ष चर्चा होऊन पुढील प्रकाशनाचा मार्गही सुकर होणार आहे.
दृष्टिहीनांनाही मिळणार उत्कट साहित्याची अनुभूती
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर प्रथमच अंध वाचकांसाठी चपराक प्रकाशनाची पाच पुस्तके प्रकाशित होत आहेत. यामध्ये संदीप वाकचौरे यांचे शिक्षणाचे पसायदान, सुहास कोळेकर यांचे रॅगिंगचे दिवस, सुप्रसिद्ध नाटककार डॉ. सोमनाथ मुटकुळे यांचे चक्र आणि इतर नाटके आणि चंद्रलेखा बेलसरे यांचे राखणदार आणि सत्यापितम या कथासंग्रहांचे यांचा समावेश आहे. त्यामुळे सर्वसामान्य वाचकांप्रमाणे दृष्टिहीनांनाही उत्कट साहित्याची अनुभूती घेता येईल.
विषयांचे वैविध्य हेच वैशिष्ट्य
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात पुस्तक प्रकाशित होणं, हा लेखकांच्या दृष्टीने सगळ्यात मोठा सन्मान असतो. या पुस्तकांमध्ये विषयांची वैविध्यता आहे. मराठी भाषेतील वैविध्य दाखवण्याची ही संधी आहे. यामुळे नवीन लेखकांची आणि विषयांची यानिमित्ताने ओळख होईल.
कथा, कविता, कादंबरी, ललित, वैचारिक, चरित्र, आत्मचरित्र, बालसाहित्य, लोककला, विनोदी लेखन, प्रवास वर्णन, गुंतवणूक अशा सर्व प्रकारातील पुस्तकांचे प्रकाशन यंदाच्या साहित्य संमेलनात होणार आहे. साहित्य संमेलनाचे आजी माजी अध्यक्ष, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक आणि मराठीतील अन्य मान्यवर साहित्यिकांची उपस्थिती हे या प्रकाशन कट्ट्याचे वैशिष्ट्य असणार आहे.
शिरीष चिटणीस, प्रकाशन कट्टा समिती प्रमुख