

मुंबई : उत्तरपत्रिकेत चारऐवजी पाच पर्याय आणि उत्तरपत्रिकेची दोन भागांत विभागणी, असे महत्त्वपूर्ण बदल महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विविध वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षांबाबत केले आहेत. यासंदर्भातील अधिकृत पत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले असून, हे नवीन बदल 1 मार्च 2026 नंतर होणाऱ्या सर्व परीक्षांसाठी लागू होणार आहेत.
आयोगाने म्हटले आहे की, मूळ उत्तरपत्रिका दोन भागांत विभागली जाईल. ती भाग-1 आणि भाग-2 अशी असेल. पहिला भाग हा उमेदवारांना प्रश्नांची उत्तरे नोंदवण्यासाठी असेल. दुसऱ्या भागामध्ये उमेदवाराचे नाव, बैठक क्रमांक, विषय सांकेतांक, प्रश्नपत्रिका क्रमांक आणि स्वाक्षरी यासारखा वैयक्तिक तपशील असेल.
परीक्षा संपल्यानंतर समवेक्षक उत्तरपत्रिकेतील भाग-1 आणि भाग-2 वेगळे करतील. यामुळे उत्तरपत्रिकेच्या मूल्यमापन प्रक्रियेत अधिक गोपनीयता राखली जाणार असल्याची माहिती आयोगाने दिली आहे.
उमेदवारांचा बैठक क्रमांक आता 8 अक्षरीऐवजी 7 अंकी असेल. विशेष म्हणजे, हा बैठक क्रमांक संबंधित जाहिरातीच्या संपूर्ण निवड प्रक्रियेसाठी कायमस्वरूपी राहणार असल्याचे आयोगाने म्हटले आहे.
...तर पाचवा पर्याय अनिवार्य
सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे आता उत्तरपत्रिकेवर चारऐवजी पाच पर्याय असतील. उमेदवाराला एखाद्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे नसेल, तर त्याला पाचवा पर्याय निवडणे अनिवार्य आहे. प्रत्येक प्रश्नासाठी पाचपैकी एक तरी वर्तुळ छायांकित करणे आवश्यक आहे. उमेदवाराने पाचपैकी एकही वर्तुळ रंगवले नाही, तर त्या प्रश्नासाठी 25 टक्के (1/4) गुण वजा केले जातील, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे.