

मुंबई: मोबाईलमध्ये डोके खुपसून बसलेल्या तरुण पिढीला पर्याय देण्यासाठी दादरच्या साहीलराज शिर्के या मराठमोळ्या तरुणाने दोन वर्षे अथक मेहनत घेऊन भारतीय संस्कृती आणि जीवनमूल्यांवर आधारित ‘मुमुक्षू’ नावाचा बोर्ड गेम तयार केला असून, त्याला सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.
या खेळामध्ये खेळाडूला जीवन प्रवास अनुभवण्यास मिळतो. धर्म, अर्थ, काम, मोक्ष या चार पुरुषार्थांवर आधारित असलेल्या या खेळात कौटुंबिक जबाबदाऱ्या, सामाजिक कर्तव्ये आणि अध्यात्मिक साधना यांचा समतोल साधला जातो. त्यामुळे हा खेळ केवळ विरंगुळा म्हणून न राहता जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणारा ठरला आहे.
देशभरातील विचारवंतांनी या मुमुक्षूचे कौतुक केले आहे. पद्मभूषण कपिल कपूर, चाणक्य या पुस्तकाचे लेखक राधाकृष्ण पिल्लई तसेच आयआयटी दिल्लीच्या तज्ज्ञांनी या खेळाची विशेष दखल घेतली आहे. देशातील नऊ शहरांमध्ये या खेळाची चाचणी घेण्यात आली असून, लवकरच हा खेळ बोर्ड गेमसोबतच डिजिटल आणि व्हर्च्युअल रिॲलिटी स्वरूपातही उपलब्ध होणार आहे.
साहीलराज शिर्के हे माहिती तंत्रज्ञानातील उच्चशिक्षित तरुण असून, त्यांनी काही वर्षे विदेशात नोकरी केली आहे. साहीलराज शिर्के यांनी भूराजकीय अभ्यासक आणि उद्योजक म्हणून ब्रिक्स शिखर परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. विदेशात असताना खेळातून शिक्षण देण्याची पद्धत त्यांनी जवळून अनुभवली.
भारतातही संस्कार आणि शिक्षण यांचा मिलाप असणारा खेळ असावा, असा विचार त्यांच्या मनात घोळू लागला. त्यातून त्यांनी आपल्या करिअरचा मार्ग बदलून संपूर्ण वेळ मुमुक्षूसाठी दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत या संकल्पनेवर आधारित या खेळाची रचना केली. मुमुक्षूमध्ये देशातील विविध ठिकाणची शक्तिपीठे, ऐतिहासिक स्थळे यांची ओळख होते. यातील खेळाडू भारतातील विविध प्रदेश, मंदिरे शोधून गुण मिळवतात.
देशासाठी काहीतरी करायचे या भावनेतून विदेशातील नोकरी सोडून मुमुक्षूची रचना केली. या खेळाची चाचणी घेण्यासाठी मला नऊ शहरांमध्ये बोलावण्यात आले होते. माहिती आणि तंत्रज्ञान तसेच उद्योग क्षेत्रातील महनीय व्यक्तींना हा खेळ खूप आवडला. या खेळाच्या पेटंटसाठी मी अर्ज केला आहे.
- साहीलराज शिर्के