

मुंबई : जुन्या वादातून पोलिसांत तक्रार केल्याच्या रागातून तालिब नवाज खान या 24 वर्षांच्या तरुणाला त्याच्याच परिचित आरोपी पिता-पुत्राने चाकूने भोसकले. ही घटना शनिवारी सायंकाळी पावणेसहा वाजता अंधेरीतील हनुमान मंदिर रोड, बिलाल मशिदीसमोर घडली. याप्रकरणी आरोपीविरुद्ध आंबोली पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी मुलगा अरबाजअली अजीज खान याला पोलिसांनी अटक केली आहे,तर अजीज खान याला पोलिसांनी पाहिजे आरोपी दाखविले आहे.
तालिब हा याच परिसरातील लालजी चाळीत राहात असून त्याचा स्वत:चा व्यवसाय आहे. खान पिता-पुत्र त्याच्या परिचित असून ते एकाच परिसरात राहतात. त्यांच्यात एक जुना वाद होता. याच वादातून तालिबने त्यांच्याविरुद्घ पोलिसांत तक्रार केली होती. त्याचा त्यांच्या मनात राग होता. शनिवारी सायंकाळी पावणेसहा वाजता तालिब हा नमाजासाठी बिलाला मशिदीत जात होता. यावेळी तिथे अरबाजअली आणि अजीज आले. त्यांनी त्याच्याशी वाद घातला. तुला आता सोडत नाही असे बोलून त्यांच्याकडील तीक्ष्ण हत्याराने त्याच्या पोटात भोसकले. त्यात तो गंभीररीत्या जखमी झाला होता. या हल्ल्यानंतर दोन्ही आरोपी पिता-पुत्र तेथून पळून गेले होते. रक्तबंबाळ झालेल्या तालिबला स्थानिक रहिवाशांनी तातडीने जवळच्या एसबीएस रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे.
याप्रकरणी तालिबची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. त्याच्या जबानीनंतर पोलिसांनी अरबाजअली आणि अजीज या दोघांविरुद्ध हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या अरबाजअलीला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला रविवारी दुपारी वांद्रे येथील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. अजीज खान हा पळून गेल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.