

मुंबई : रहिवाशांचा पाठिंबा असतानाही विकासकावर कारवाई करण्याच्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या कृतीमुळे वरळी कोळीवाड्यातील 10 हजार मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. येथील चैतन्य साई जनता कॉलनी, सागर दर्शन आणि अन्य एका झोपडपट्टीचा पुनर्विकास झोपु प्राधिकरणाच्या नोटिशीमुळे रखडला आहे.
वरळी कोळीवाडा येथे चैतन्य साई जनता कॉलनी येथे 2 हजार 54 सभासद आहेत. 2022 साली येथील रहिवाशांनी आकाश गुप्ता यांची विकासक म्हणून नियुक्ती केली. समुद्र किनारपट्टीला लागून असलेल्या जमिनींच्या मालकीबाबत राज्य शासनाने आखलेल्या धोरणांतर्गत संबंधित गृहनिर्माण संस्थेला जमिनीची मालकी मिळवण्यात यश आले. या जागेचे इतर कोणीही मालक नसल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. विकासकाने सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर झोपु प्राधिकरणाकडून पात्रताधारकांचे परिशिष्ट 2 जाहीर करण्यात आले.
प्रकल्पाचे काम सुरू होण्यापूर्वीच बॉम्बे पोर्ट ट्रस्टने जमिनीचे मालक असल्याचा दावा करत उच्च न्यायालयात धाव घेतली. परिणामी, गेल्या वर्षी न्यायालयाने या प्रकल्पाला स्थगिती दिली. अद्याप या प्रकल्पाचा निकाल लागलेला नाही. त्यामुळे विकासकाला काहीच काम करता आले नाही.
सागर दर्शन गृहनिर्माण संस्थेच्या पुनर्विकासासाठी 1996 ते 2023 या काळात दोन विकासकांनी पुढाकार घेतला. मात्र त्यांनी हा प्रकल्प पूर्ण केला नाही. त्यानंतर आकाश गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली. गेल्या वर्षभरात येथील इमारतींच्या जोत्याचे काम पूर्ण झाले आहे. तसेच सर्व 250 सभासदांना भाडेही देण्यात आले आहे. अन्य एका प्रकल्पात 40 सभासद आहेत. या तिन्ही प्रकल्पांना प्राधिकरणाने 13(2)ची नोटीस पाठवत विकासकाला काढून टाकण्याची कारवाई केली.
उच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित असताना प्राधिकरणाने नोटीस कशी पाठवली, असा प्रश्न रहिवासी उपस्थित करत आहेत. तसेच सागर दर्शन सोसायटीचे काम या नोटिशीमुळे थांबले आहे.तिसऱ्या प्रकल्पातील रहिवाशांनाही त्यांचा प्रकल्प पुढे नेता येणार नाही. त्यामुळे जवळपास 10 हजार रहिवाशांमध्ये झोपु प्राधिकरणाविरोधात असंतोष आहे. त्यामुळेच त्यांनी पालिका निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला आहे.