

मुंबई : कुलाबा येथील बोमन बेहराम मार्ग, ताज हॉटेलच्या मागे असलेल्या सोशल सर्व्हिस हॉटेलच्या स्वयंपाकघरात रविवारी, 21 डिसेंबर रोजी 4.30 वाजेच्या दरम्यान आग लागली. या आगीत सुनील सिंग (28) 5%, तर सुब्रत बराई (35) 15% भाजले. या दोघांनाही सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षवर्धन बनसोडे यांनी दिली.
सोशल सर्व्हिस हॉटेल हे तळमजला ते 4 मजली आहे. या हॉटेलच्या स्वयंपाकघरात आग लागली होती. आगीची माहिती कळताच घटनास्थळी अग्निशमन दलाने धाव घेऊन बचावकार्य सुरू केले होते. शर्तीच्या प्रयत्नांनंतर अग्निशामन दलाने अवघ्या अर्ध्या तासांत आग विझवल्याने पुढील जीवितहानी टळली. आग कशामुळे लागली याचे कारण अद्यापही अस्पष्ट असून अग्निशामन दल आणि कुलाबा पोलीस एकत्र चौकशी करत आहे.