

मुंबई : गोरेगाव- मुलुंड जोड रस्त्यावरील (GMLR) पुलाच्या कामामुळे १२०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी बाधित होत आहे. त्यामुळे ‘टी’ विभागामध्ये मॅरेथॉन मॅक्सिमा इमारत ते तानसा पुलादरम्यान रस्त्यालगत असणारी जलवाहिनी वळविण्यात येणार आहे. या १२०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी दोन ठिकाणी जोडण्याचे काम गुरूवारी २१ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजेपासून ते शुक्रवारी २२ ऑगस्ट रोजी पहाटे ४ वाजेपर्यंत हाती घेण्यात आले आहे. या कामकाजादरम्यान ‘टी‘ विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा १८ तास पूर्णपणे बंद राहणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून रविवारी (दि.१८) देण्यात आली.
गोरेगाव - मुलुंड जोड रस्त्यालगतचा परिसर मुलुंड (पश्चिम), लाल बहादूर शास्त्री मार्ग (एल. बी. एस. रोड) लगतचा परिसर मुलुंड (पश्चिम), जवाहरलाल नेहरु मार्ग (जे. एन. रोड), देवीदयाल मार्ग, क्षेपणभूमी (डम्पिंग ग्राऊंड रोड), डॉ. आर. पी. मार्ग, पी. के. मार्ग, झवेर मार्ग, महात्मा गांधी मार्ग (एम. जी. रोड), एन. एस. मार्ग, एस. एन. मार्ग, आर. एच. बी. मार्ग, वालजी लाढा मार्ग, व्ही. पी. मार्ग, मदन मोहन मालवीय मार्ग, एसीसी मार्ग, बी. आर. मार्ग, गोशाळा मार्ग, एस. एल. मार्ग, नाहुर गाव, इत्यादी ठिकाणी पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. पाणीपुरवठा बंदच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरावे, तसेच पुढील ४ ते ५ दिवस पाणी उकळून-गाळून प्यावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.