

City's water supply disrupted again, water main burst in three places
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: शहर पाणीपुरवठ्यामागे लागलेले शुक्लकाष्ट सुरूच असून, शनिवारी (दि. २६) रात्री ढोरकीन येथील सातशे मिमी व्यासाची जलवाहिनी वारंवार फुटत असल्याने ती बदलण्याचे काम हाती घेण्यात आले. त्यासोबतच चितेगाव येथे सातशेची जलवाहिनी फुटली आणि नऊशेच्या जलवाहिनीचे दोन पाईप निखळल्याने कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने शहराचा पाणीपुरवठा पुन्हा विस्कळीत झाला आहे. एकाच दिवशी तीन ठिकाणी जलवाहिनी फुटली. मात्र महापालिकेच्या अभियंत्यांनी दिवसरात्र एक करून दुरुस्तीचे काम पूर्ण केले.
पावसाळा सुरू झाल्यानंतरही शहराच्या पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडलेले आहे. मागील आठवड्यात सलग तीन दिवस पाणीप-रवठा बंद ठेवण्यात आला. त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्याचे नियोजन विस्कळीत झाले. यात अद्यापपर्यंत सुधारणा झालेली नसून, दहा ते बारा दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे.
त्यातच शनिवारी दुपारी शहराला पाणीपुरवठा करणारी सातशे मिमी व्यासाची जलवाहिनी फुटली. ही जलवाहिनी बदलण्याचे काम हाती घेण्यात आले. रात्री दहा वाजेच्या सुमारास चितेगावात सातशेची जलवाहिनी फुटल्याने दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले. त्यानंतर नऊशे मिमीच्या जलवाहिनीचे दोन पाईप निखळले. त्यानंतर मनपाचे कार्यकारी अभियंता किरण धांडे, उपअभियंता बी. बी. बाविस्कर, कनिष्ठ अभियंता सुहास लोहाडे, आशिष वाणी यांच्यासह कंत्रादाराच्या कामगारांनी या दोन्ही जलवाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला ९०० मिमी व्यासाची जलवाहिनी फारोळा येथील सम्पला आणि नवीन २६ एमएलडी क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्राला जोडण्यासाठी तीन दिवसांचा खंडण काळ देण्यात आला. मजीप्राने जलवाहिनी जोडणीचे काम हाती घेतले असून एक सम्प रिकामा करण्यात आला आहे. तसेच फार-ोळा येथील जोडणी व पंपगृहातील आणि पंपिंगची कामे करण्यासाठी खंडण काळ देण्यात आलेला आहे.
जायकवाडी ते ढोरकीनपर्यंत सातशे मिमी व नऊशे मिमी दोन्ही जलवाहिन्या सुरू आहेत. तसेच बाराशे मिलिमीटर जलवाहिनीही शहरापर्यंत सुरू आहे. ढोरकीनपासून फारोळ्यापर्यंत नऊशेची जलवाहिनी सुरू असून, बाराशेची जलवाहिनीही सुरू आहे. फारोळापासून नक्षत्रवाडीपर्यंत बाराशेची जलवाहिनी सुरू असून, फारोळा ते नक्षत्रवाडी सातशेची जलवाहिनी व्यवस्थित असल्यामुळे ती देखील सुरू आहे. वरील प्रमाणे नियोजन असले तरीही शहराचा पाणीपुरवठा सुरू असून, काही भागांना कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे मनपाच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता किरण धांडे यांनी कळविले आहे.