

Purna Water Supply Scheme Bhumi Pujan Nagarotthan Yojana
पूर्णा : प्रशासकीय पातळीवर आणि शासनाकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे पूर्णा शहरासाठी 'नगरोत्थान योजने'अंतर्गत तब्बल ७५ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर करून आणली आहे, असे प्रतिपादन आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी केले. शुक्रवारी (दि. ८ ) आयोजित या योजनेच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. या योजनेमुळे शहरातील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटण्यास मदत होणार आहे.
यावेळी बोलताना आमदार गुट्टे म्हणाले, ही पाणीपुरवठा योजना होऊ नये यासाठी काही लोकांनी अडथळे आणण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले. विकासाच्या कामात कोणीही राजकारण आणू नये. शहरातील सर्व गटा-तटांनी आणि माजी नगरसेवकांनी आपापसातील मतभेद विसरून शहराच्या विकासासाठी एकत्र यावे.
आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार गुट्टे यांनी एकजुटीचे आवाहन केले. "सर्वांनी एकत्र येऊन 'आमदार गुट्टे काका मित्रमंडळा'च्या माध्यमातून पूर्णा विकास आघाडीच्या बॅनरखाली निवडणूक लढवून एकहाती सत्ता आणावी. मी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी एवढा निधी आणून देईन की त्याची कोणी कल्पनाही केली नसेल. शहराला विकासाचे मॉडेल बनवायचे असेल, तर स्वार्थ बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. विनय वाघमारे होते. यावेळी आमदार गुट्टे काका मित्रमंडळाचे नितीन कदम, सुभाषराव देसाई, हरिभाऊ कदम, नंदकुमार डाखोरे, ॲड. राजू भालेराव, हर्षवर्धन गायकवाड, अनिल खरखराटे, प्रवीण अग्रवाल यांच्यासह अनेक प्रमुख कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
शहराला पाणीपुरवठा करणारी जुनी योजना जीर्ण झाल्याने नागरिकांना अनियमित पाणीपुरवठ्याला सामोरे जावे लागत होते. नवीन योजनेमुळे ही समस्या कायमची दूर होणार आहे.
गोदावरी नदीपात्राजवळील डिग्रस बंधाऱ्याशेजारी महागाव शिवारात एक मोठी विहीर खोदण्यात येणार आहे. तिथून शहरापर्यंत १२ किलोमीटर लांबीची मुख्य पाईपलाईन टाकली जाईल. शहरामध्ये सुमारे ७५ किलोमीटर लांबीची नवीन वितरण व्यवस्था (पाईपलाईन) असेल. दररोज ४५ लाख लिटर पाण्यावर प्रक्रिया करणारा जलशुद्धीकरण प्रकल्प उभारला जाईल.
शहरात नालंदा नगर: २.९० लाख लिटर, कोळी गल्ली: ९.६० लाख लिटर, बोर्डीकर कॉलनी: ६.४० लाख लिटर, शास्त्रीनगर: ३.६६ लाख लिटर या ४ ठिकाणी मोठे जलकुंभ बांधले जाणार आहेत.
ही योजना कार्यान्वित झाल्यानंतर पूर्णा शहरातील नागरिकांना वर्षभर शुद्ध आणि मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे. योजनेचे काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करावे, अशा सूचना आमदार गुट्टे यांनी संबंधित कंत्राटदाराला दिल्या असून, या कामात कोणीही अडथळा आणू नये, असे आवाहनही त्यांनी नागरिकांना केले आहे.