

मुंबई: लोकमधून प्रवास करताना रेल्वे मार्गालगतची भाजीपाला शेती मुंबईकरांनी पाहिली असेल पण आता मुंबईतील उड्डाण पुलांखालीही फळे-भाज्यांचे बहरलेले मळे मुंबईकर पाहणार आहेत. मुंबईतील शहर शेतीचा हा पहिला प्रयोग महापालिका विलेपार्ले पूर्व येथे राबवत असून रविवारी महापौर त्याचा शुभारंभ करणार आहेत.
दाटीवाटीची वस्ती असलेल्या मुंबईत शहर शेतीसाठी जागा आहे कुठे ? मात्र यातून मार्ग काढत विलेपार्ले कल्चरल सेंटरतर्फे मुंबई विमानतळ टी वन मेट्रो स्थानकासमोरील उड्डाणपुलाखाली हा प्रकल्प साकारण्यात येत आहे.
आमदार पराग अळवणी यांची ही संकल्पना असून त्याचे उद्घाटन रविवार 20 एप्रिलला महापौर करणार असून उपमहापौर संजय घाडी आणि महापालिका आयुक्त अश्विनी भिडे तसेच अन्य मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे नगरसेवक मिलिंद शिंदे यांनी सांगितले.
शहरी शेती प्रकल्पांतर्गत शास्त्रीय पद्धतीने मातीचा वापर करत वाफे तयार करण्यात आले आहेत. त्यावर विविध फळ भाज्या लावण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे येथे मराठी विज्ञान परिषदेच्या प्रेरणेने शहरी शेती अभ्यास वर्ग चालवण्यात येणार आहे.
अनुभवी व प्रशिक्षित मान्यवर प्रत्यक्ष शेती कामाविषयी मार्गदर्शन करणार आहे.यासह वनस्पती वैविध्य दालन आणि वनस्पती सांभाळ केंद्रसुद्धा चालवण्यात येणार आहेत. पक्ष्यांना आकर्षित कसे करावे, माळी काम कसे करावे आदी विषयांची कार्यशाळा घेण्यात येणार आहे. यामुळे पुलांखालील अतिक्रमणांचा प्रश्नही सुटणार आहे.