

मुंबई: मुंबई शहर व उपनगरातील पार्किंगची कमतरता लक्षात घेऊन, भाजपा शिवसेना महायुतीने पालिकेच्या प्रत्येक विभाग कार्यालयाच्या हद्दीत भूमिगत पार्किंग उभारण्यासाठी स्थायी समितीच्या माध्यमातून 26 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे. त्यामुळे भूमिगत पार्किंगचा श्री गणेशा चालू आर्थिक वर्षात होणार आहे.
मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शहरात पार्किंगची बोंब आहे. पुरेसे पार्किंग उपलब्ध नसल्यामुळे वाहन चालकांना रस्त्याच्या कडेला तर काही वेळा पदपथावरही आपली वाहने उभी करावी लागत आहेत. पण यामुळे वाहतूक कोंडीसह पदपथावरून चालताना नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
त्यामुळे मुबलक पार्किंग उपलब्ध करून देण्यासाठी भाजपाने आपल्या वचननाम्यामध्ये मुंबईकरांना वचन दिले होते. त्यानुसार महापालिकेच्या पहिल्याच अर्थसंकल्पात स्थायी समितीला मिळालेल्या अधिकाराखाली भूमिगत पार्किंग उभारण्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. पालिकेच्या 26 विभाग कार्यालयाच्या हद्दीत भूमिगत पार्किंग तयार करण्यात येणार आहे. यासाठी लवकरच त्या त्या विभागाच्या सहाय्यक आयुक्तांना भूमिगत पार्किंगसाठी जागा शोधण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
प्रत्येक विभाग कार्यालयाच्या हद्दीत उद्यान, मैदान, मनोरंजन मैदान असून या उद्यान व मैदानाखाली भूमिगत पार्किंग तयार करता येईल की नाही, याचा अभ्यास करण्यात येणार आहे. पालिकेच्या सर्व विभाग कार्यालयातून भूमिगत पार्किंगसाठी जागा उपलब्धतेचा अहवाल आल्यानंतर टप्प्याटप्प्याने निविदा प्रक्रिया राबवून भूमिगत पार्किंगचे कंत्राट देण्यात येणार आहे. भूमिगत पार्किंग करताना उद्यान व मैदान जैसे थे राहतील याची विशेष काळजी घेण्याचे निर्देश स्थायी समितीकडून देण्यात आले आहेत.
38 हजार गाड्यांसाठी पार्किंग
मुंबई शहर व उपनगरात रस्त्यावर 65 सशुल्क पार्किंग सध्या कार्यान्वित
आहेत. त्यांची एकूण वाहन क्षमता 8,258 इतकी आहे. याव्यतिरिक्त महापालिकेला इमारत व्यवसायिकांकडून 37 ठिकाणी सार्वजनिक पार्किंग चालवण्यासाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली असून येथील पार्किंगची एकूण क्षमता 29 हजार 769 इतकी आहे.
सहा ते सात हजार गाड्यांचे पार्किंग उपलब्ध होणार
सर्व विभागात उभारण्यात येणाऱ्या भूमिगत पार्किंगमुळे सुमारे सहा ते सात हजार गाड्यांचे पार्किंग उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सरासरी एका भूमिगत पार्किंग मध्ये 250 ते 300 गाड्या उभ्या राहतील एवढी जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. विशेष म्हणजे काही भूमिगत पार्किंगमध्ये दोन मजलेही उभारण्याचा विचार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.