

मुंबई: मंत्र्यांसाठी दालने अपुरी पडत असल्याने मंत्रालयाच्या आवारातच नवीन इमारत (अनेक्स 2) उभारली जात आहे. ही इमारत बांधकामाधीन असताना मंत्र्यांना नव्या इमारतीतील दालनांचे वाटप करण्यात आले. दोन कॅबिनेट मंत्री आणि पाच राज्यमंत्री अशा सात मंत्र्यांना नव्या इमारतीत प्रशस्त दालन मिळाले आहे. या इमारतीमध्ये मुख्यमंत्री कार्यालयासाठी संपूर्ण पहिला मजला मिळाला आहे. सामान्य प्रशासन विभागाने शुक्रवारी याबाबतचा शासन निर्णय जारी केला.
सध्या मंत्रालयाच्या आवारात मुख्य इमारत आणि विस्तारीत इमारत अशा दोन सात मजली इमारती आहेत. महायुतीच्या जम्बो मंत्रिमंडळामुळे या दोन इमारतींमध्ये 42 मंत्र्यांची दालने आणि त्यांच्या कार्यालयासाठी जागा अपुरी पडू लागल्याने मुख्य इमारतीच्या शेजारी असलेल्या गार्डन गेटजवळील पाच हजार चौरस मीटरच्या जागेत पाच मजली इमारत उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
नव्या इमारतीत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर या दोन कॅबिनेट मंत्र्यांसह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, इंद्रनील नाईक, योगेश कदम, माधुरी मिसाळ आणि मेघना दीपक बोर्डीकर-साकोरे यांना जागा मिळाली आहे. मंत्रालयाबाहेर असलेल्या वैद्यकीय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना नव्या इमारतीत जागा उपलब्ध झाली आहे.
मुख्य मंत्रालय इमारतीच्या सहाव्या मजल्यावर मुख्यमंत्री कार्यालयासाठी जागा असताना नव्या इमारतीचा पहिला मजला मुख्यमंत्री कार्यालयाला देण्यात आला आहे. पहिल्या मजल्यावर मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष, विकसित महाराष्ट्र, सेजीस टीम, सल्लागार आणि सीएम डॅशबोर्डसाठी, विशेष कार्यकारी अधिकारी यांच्यासाठी आणि योजना सामान्य कक्षासाठी जागा मिळाली आहे.
तळमजल्यावर प्रवेश लॉबीसह उपाहारगृह आणि स्वागत कक्ष असणार आहे.दरम्यान, कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्र्यांची दालने नव्या इमारतीत स्थलांतरित झाल्यानंतर सध्या बाहेर असलेल्या पाणीपुरवठा आणि स्वच्छता, ग्रामविकास, दिव्यांग कल्याण मंत्रालय या विभागांना मंत्रालयात जागा दिली जाणार आहे.