मुंबई : मंदिराखाली गाडलेल्या सोन्याचा खजिना देण्याच्या बहाण्याने मुंबईतील एका व्यावसायिकाची तब्बल 25 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणात, मालाड पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या टोळीतील चार सदस्यांना अटक केली आहे.
पोलिसांनी या आरोपींकडून 15 लाख 45 हजार रुपये रोख रक्कम आणि बनावट सोन्याचा खजिना जप्त केला आहे. त्यांनी व्यावसायिकाला दीड कोटी रुपयांच्या सोन्याच्या बदल्यात बनावट सोने देऊन २५ लाख रुपयांची फसवणूक केली आणि नंतर पळून गेले.
बाबुलाल भागलाराम वाघेला (५५), मंगलराम मनराम वाघेला (३४), केसराम भगत राम वाघेला (४१) आणि भवरलाल बाबुलाल वाघेला (४८) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यातील एक गुजरातचा आहे आणि तिघे विरारचे आहेत. बाबुलाल वाघेला याच्याविरुद्ध गुजरातमध्ये सोन्याच्या खजिन्याचे आश्वासन देण्याच्या बहाण्याने फसवणुकीचे तीन गुन्हे दाखल आहेत. मालाड पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.