

राजेंद्र पाटील
नवी मुंबई: एकाच जिल्ह्यात तीन वर्षांहून अधिक काळ राहिलेल्या सुमारे 45 ते 50 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या शनिवारपर्यंत केल्या जाणार आहेत. राज्य निवडणूक आयोग 16 डिसेंबर मंगळवारी रोजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याकडून तातडीने अशा पोलीस अधिकाऱ्यांची माहिती घेणार आहे.
दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेल्या अपर पोलीस महासंचालक, पोलीस महानिरीक्षक, पोलीस अधीक्षक, पोलीस उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त अशा पोलीस अधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. या व्यतिरिक्त एकाच आयुक्तालयात तीन वर्षांचा कालावधी पूर्ण झालेल्या उपनिरीक्षकांपासून ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांचीही माहिती घेतली जाणार आहे.
राज्यात 29 महापालिकांचा सोमवारी दुपारनंतर निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला. निवडणूकी आधीच म्हणजे गेल्या महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोली गेले होते. त्याच दिवशी संध्याकाळी राज्य पोलीस दलातील अपर पोलीस महासंचालक ते पोलीस उपायुक्त दर्जीच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार होत्या. त्यामध्ये नवी मुंबई, पुणे, ठाणे, पिंपरी चिंचवड, नाशिक,नागपूर पोलीस आयुक्तांसह सह पोलीस आयुक्त, विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस महानिरीक्षक, पोलीस उप महानिरीक्षक,पोलीस अधिक्षक, पोलीस उपायुक्त अशा 45 ते 50 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या समावेश आहे. यात 28 पोलीस उपायुक्त आहेत. तर आठ पोलीस आयुक्त आहेत. सुमारे 13 पोलीस अधीक्षक असण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे सुमारे 22 पोलीस उपायुक्त यांचा कार्यकाळ पूर्ण होऊनही त्यांच्या अद्याप बदल्या झाल्या नाहीत. शिवाय 10 ते 12 पोलीस महानिरीक्षक यांना पदोन्नती देऊन बदल्या केल्या जाणार आहेत.
विधानसभा निवडणुकी दरम्यान आणि त्या आधी 68 पोलीस उपायुक्तांच्या बदल्या झाल्या होत्या. तर एकाच जिल्हयात तीन वर्षांहून अधिक कार्यकाळ झालेले पोलीस उपनिरीक्षक ते सहायक आयुक्त यांच्या ही बदल्या केल्या जाणार आहेत. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या 31 डिसेंबरला सेवानिवृत्त होत आहेत. त्यानंतर सदानंद दाते हे पोलीस महासंचालक होतील. नवीन पोलीस महासंचालकांचा काही पोलीस उपायुक्तांनी चांगलाच धसका घेतला आहे. काही उपायुक्तांनी थेट पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यना क्रिम पोस्टिंगसाठी साकडे घातले आहे. शुक्ला यांच्यामार्फत आपली वर्णी लावण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे खास सूत्रांनी सांगितले.