

Akshay Kumar Vehicle Accident
जुहू: मुंबईतील जुहू परिसरात सोमवारी रात्री एक भीषण अपघात झाला. एका भरधाव मर्सिडीज कारने रिक्षाला जोराची धडक दिली, ज्यामुळे ही रिक्षा बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या ताफ्यातील सुरक्षा वाहनावर (पायलट कार) जाऊन आदळली. या घटनेत रिक्षाचालक गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सोमवारी रात्री ८ ते ८:३० च्या सुमारास घडली. अक्षय कुमारचा ताफा जुहू परिसरातून जात असताना हा अपघात झाला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय कुमारच्या ताफ्यातील इनोव्हा कारच्या मागे एक मर्सिडीज आणि एक रिक्षा होती. मर्सिडीजने रिक्षाला मागून जोरदार धडक दिली, ज्यामुळे रिक्षाचे नियंत्रण सुटले आणि ती थेट अक्षय कुमारच्या सुरक्षा ताफ्यातील इनोव्हा कारवर जाऊन आदळली.
या अपघातात रिक्षाचे प्रचंड नुकसान झाले आहे. जखमी रिक्षाचालकाचा भाऊ मोहम्मद समीर याने सांगितले की, "माझा भाऊ रिक्षा चालवत असताना मागून आलेल्या कारने धडक दिली. यात रिक्षाचा पूर्णपणे चक्काचूर झाला असून माझा भाऊ आणि एक प्रवासी रिक्षाखाली दबले गेले. सध्या भावाची प्रकृती चिंताजनक आहे. त्याला योग्य उपचार मिळावेत आणि रिक्षाच्या नुकसानीची भरपाई मिळावी, हीच आमची मागणी आहे."
जुहू पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी रिक्षाचालकाला रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी या प्रकरणाचा पंचनामा केला असून अद्याप अधिकृत एफआयआर नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलीस आता मर्सिडीज चालकाची चौकशी करत असून अधिक तपास सुरू आहे.