मुंबई : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांना 15 टक्के पाणी कपातीला सामोरे जावे लागले. काही भागांत कमी दाबाने, तर काही भागांत अजिबातच पाणी आले नाही. याचा सर्वाधिक फटका दक्षिण मुंबईतील गिरगाव, काळबादेवी, फोर्ट, कुलाबा, कुर्ला, विक्रोळी, सांताक्रूझ, जोगेश्वरी, कांदिवली, दहिसर आदी भागाला बसला. त्यांना टँकरचा आधार घ्यावा लागला.
मागील आठवड्यात 2 डिसेंबर रोजी असेच मुंबईकरांचे पाणीहाल झाले होते. भांडुप जलशुद्धीकरण केंद्रास पाणीपुरवठा करणारी तानसा जलवाहिनी बदलण्याचे काम सोमवारी सकाळी दहा वाजल्यापासून हाती घेतले आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या 26 विभाग कार्यालयांपैकी 17 विभाग कार्यालयांच्या हद्दीत सोमवारी सकाळी 10 वाजल्यापासून मंगळवार सकाळी 10 वाजेपर्यंत ही 15 टक्के पाणीकपात करण्यात आली आहे.
सोमवारी शहर विभागातील कुलाबा, फोर्ट, चंदनवाडी, काळबादेवी चिरा बाजार, गिरगाव, ताडदेव, मुंबई सेंट्रल, वरळी, लोअर परेल, दादर, शिवाजी पार्क, धारावी तर पूर्व उपनगरात कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप व पश्चिम उपनगरात वांद्रे पूर्व पश्चिम, खार पूर्व पश्चिम, सांताक्रूज पूर्व पश्चिम, अंधेरी पूर्व पश्चिम, जोगेश्वरी, गोरेगाव पूर्व पश्चिम, कांदिवली, बोरिवली, दहिसर परिसरातील पाणीपुरवठ्यावर मोठा परिणाम झाला. गिरगाव, काळबादेवी, फोर्ट, कुलाबा, कुर्ला, विक्रोळी, सांताक्रूझ, जोगेश्वरी, कांदिवली, दहिसर या भागांत अनेक ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा झाल्यामुळे अनेकांना पाणीच मिळाले नाही, तर काही भागांत अजिबातच पाणी आले नाही. मागणीनुसार टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. महापालिकेचे टँकर अपुरे असल्यामुळे खासगी टँकरद्वारे झोपडपट्टी परिसरात पाण्याचा पुरवठा करण्यात आला.