मुंबई ः मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील विस्कळीत कारभाराचा आणखी एक नमुना सोमवारी पुन्हा पाहायला मिळाला. विधी शाखेच्या पाचव्या सत्राची भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 या विषयाच्या उत्तरपत्रिकांवर चिकटवायचे बारकोड स्टिकर्स परीक्षा केंद्रावर वेळेत न पोहोचल्याने विद्यार्थ्यांना तब्बल तासभर वर्गात थांबवून ठेवावे लागले. परीक्षेची वेळ संपल्यानंतरही विद्यार्थ्यांच्या हातात उत्तरपत्रिका होत्या यामुळे विद्यार्थ्यांनी संपात व्यक्त केला.
विधी शाखेच्या पाचव्या सत्राची भारतीय नागरिक सुरक्षा संहिता सकाळी 10.30 ते 1.00 या वेळेत आयोजित करण्यात आली होती. दक्षिण मुंबईतील आणि पश्चिम उपनगरातील काही महविद्यालयांच्या केंद्रावर परीक्षा सकाळी ठरलेल्या वेळेनुसार सुरळीत सुरू झाली; मात्र उत्तरपत्रिका जमा करण्याची वेळ जवळ आली तरीही बारकोड स्टिकर्स परीक्षा कक्षात पोहोचलेले नव्हते. यामुळे उत्तरपत्रिका स्वीकारण्याची प्रक्रिया थांबवण्यात आली आणि विद्यार्थ्यांना जागेवरच थांबण्याचे निर्देश देण्यात आले. जवळपास तासभर बारकोड स्टिकर्सची प्रतीक्षा सुरू राहिली होती.
विद्यापीठाकडून बारकोड मिळाल्यानंतर हे स्टिकर्स प्रत्येक उत्तरपत्रिकेवर लावण्याची प्रक्रिया सुरु झाली, परीक्षेचा वेळ संपल्यानंतरही बाहेर पडता न येणाऱ्या परिस्थितीमुळे अनेक विद्यार्थी संतप्त झाले होते. या प्रकारामुळे पुन्हा एकदा विद्यापीठाच्या परीक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना विद्यापीठ प्रशासनाने सांगितले की, सदर महाविद्यालयांनी परीक्षेशी संबंधित आवश्यक तपशील विद्यापीठाकडे उशिरा सादर केल्याने बारकोड स्टिकर्स तयार होण्यास विलंब झाला. त्यामुळे उशिर झाला.
कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी
मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी. उद्या आम्ही कुलगुरू डॉ. प्रा. रविंद्र कुलकर्णी यांची भेट घेणार असून विद्यार्थ्यांना नाहक त्रास देणाऱ्या परीक्षा केंद्रातील किंवा विद्यापीठातील जबाबदार अधिकाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.