

मुंबई: मुंबईतील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसन योजनेत शंभर कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा सुरू असल्याचा आरोप करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते खासदार संजय राऊत यांनी खळबळ उडवून दिली आहे.
मुंबईचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या शिफारसपत्राचा आधार घेऊन एमएमआरडीए, पालिका, एसआरए यांची फसवणूक करून बोगस लाभार्थ्यांना घरांचे वाटप केले जात आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांच्या सदनिका वाटपात गैरव्यवहार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा, अशी मागणी राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे.
प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसन योजनेतील गैरव्यवहारासंदर्भात संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. मुंबई शहर व उपनगरातील विकास प्रकल्पांमुळे बाधित झालेल्या नागरिकांना पुनर्वसन म्हणून घरे देण्याची ‘पीएपी’ योजना ही सरकारची आहे.
मात्र, या योजनेत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, एमएमआरडीए, मुंबई महानगरपालिका आणि म्हाडा या यंत्रणांवर दबाव टाकून बोगस लाभार्थ्यांना सदनिका देण्याचे रॅकेट सुरु असल्याचे राऊत म्हणतात या संस्थेकडून बनावट लाभार्थ्यांची यादी तयार करून, त्याला मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचे शिफारस पत्र जोडून संबंधित प्राधिकरणांवर दबाव आणायचे व बोगस लोकांना सदनिका विकून लाखो रुपयांचे कमिशन खायचे असा हा प्रकार सुरू असल्याचा दावाही राऊत यांनी केला.
या रॅकेटमध्ये ‘वीरेंद्र प्रताप उर्फ बबलू सिंह’ याचा सहभाग असून तो सकल हिंदू समाजाच्या नावाने हे उद्योग करतो. बनावट कागदपत्रे, खोटी ओळखपत्रे आणि खोट्या सही-शिक्क्यांच्या आधारे सदनिका बळकावून त्यांची विक्री करण्याचा गोरखधंदा सुरु आहे. त्यामुळे मूळ प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या हक्काच्या घरांपासून वंचित राहावे लागत असल्याने या रॅकेटवर कारवाई होणे गरजेचे असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.